रस्ते खड्डेमुक्तीसाठी मंत्रालयात वॉररूम!

0

मुंबई । राज्यामध्ये रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे सरकारला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने टिकेचा धनी झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता खड्डेमुक्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. राज्याला खड्डेमुक्त करण्यासाठी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात वॉररूम उभारण्यात आली असून याद्वारे राज्यभरात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांचा लाईव्ह आढावा घेतला जाणार आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, 15 डिसेंबरपर्यंत कुठल्याही परीस्थित खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या कामात जर ठेकेदार हलगर्जीपणा दाखवत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल असा इशारा देत ठेकेदाराने केलेल्या रस्त्याच्या कामानंतर त्या ठिकाणी त्या ठेकेदारचे नाव व संपर्क क्रमांकाचे फलक लावण्याबाबत विचार आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दररोज राज्यभरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा वॉर रूममधून आढावा
15 डिसेंबरचे खड्डेमुक्त महाराष्ट्राचे मिशन पूर्ण करण्यासाठी आणि राज्यभरात सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात वॉररूम उभारण्यात आली आहे. या ठिकाणी राज्यातील सर्व ठिकाणच्या कामाचे लाईव्ह अपडेट घेतले जात असून काम सुरु असलेल्या ठिकाणच्या अधिकार्‍यांशी रोज थेट कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जात आहे. या रूममधून रोज दैनंदिन किती रस्ते झाले? कुठे काम सुरु आहे? याचा आढावा घेतला जाणार आहे. सोबतच चंद्रकात पाटील यांच्या ट्वीटरवरून झालेल्या कामाचे फोटो शेयर केले जात आहेत.

सध्याची नेमकी स्थिती काय?
संपूर्ण राज्यातील खड्डेमुक्तीसाठी 1 लाख कोटींचा निधी आवश्यक आहे, मात्र बांधकाम विभागाकडे फक्त 1200 कोटींचे बजेट आहे. आम्ही ते वाढवून 4 हजार कोटी करून घेतले असून त्यातून खड्डे बुजविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अपुर्‍या निधीमुळे यापुढे रस्त्यांसाठी फक्त 10 किमीचे टेंडर काढणार असून ठेकेदारांना पहिल्यांदा 40 टक्के रक्कम आणि उर्वरीत 60 टक्के पुढील दहा वर्षांत अदा करणार असल्याचे पाटील म्हणाले.3.50 लाख किमी रस्ते राज्यात आहेत यापैकी 97 हजार पीडब्ल्यूडीकडे आहेत.