रस्ते दुरुस्तीमध्ये दिरंगाई

0

सणसवाडी । मुसळधार पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. मागील आठवड्यात खड्डे दुरुस्ती होणार होती. परंतु अजूनही ठिकठिकाणी तसेच खड्डे दिसत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून खड्डे बुजविण्यासाठी लागणारे साहित्य जादा प्रमाणात टाकले जात असून कितीतरी साहित्य वाया जात असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

तळेगाव-शिक्रापूर, शिक्रापूर-पाबळ, शिक्रापूर-कान्हूर मसाई आदी गावांतील रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. बुजवलेले खड्डे पुन्हा नादुरुस्त झाले आहेत. सदर खड्डे बुजाविण्याची मागणी होत असताना प्रत्येक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक दगड, खडी, मुरूम, डांबर हे क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आणले जातात. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी ते तसेच पडून आहेत. शिल्लक राहिलेले हे साहित्य अस्ताव्यस्त विखुरले जात आहे. त्यामुळे शासनाच्या निधीतील लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. कित्येक ठिकाणी अद्यापही रस्त्यावर खड्डे असून त्या ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी खडी, मुरूम हे मटेरियल शिल्लक नाही. त्यामुळे रस्त्यावर असलेले खड्डे तसेच राहत असून त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यावर पसरलेल्या खडी वरून वाहने घसरून अनेकजण जखमी होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.