रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणांवर दसर्‍यानंतर हातोडा!

0

मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असलेल्या भागाचा आराखडा तयार होणार

पिंपरी-चिंचवड : शहराच्या विविध भागातील पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. पदपथांवर अतिक्रमण झाल्याने पादचार्‍यांना चालण्यासही जागा शिल्लक राहिलेली नाही. याबाबत नागरिकांकडून सतत तक्रारी होत असल्याने अशा अतिक्रमणांवर महापालिका प्रशासन आता हातोडा चालविणार आहे. दसर्‍यानंतर अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा मुहूर्त महापालिकेने निश्‍चित केला आहे. अतिक्रमण कारवाईसाठी अद्ययावत साधन सामुग्रीसह नवीन मध्यवर्ती कक्षाची स्थापना करण्यात यावी, अशी सूचना स्थायी समितीने महापालिका प्रशासनाला केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील पदपथांवर झालेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे. तसेच, रस्त्यांच्या आजूबाजूला, चौकांमध्ये झालेले अतिक्रमणदेखील हटविण्यात येणार आहे. ही कारवाई यापुढे सातत्याने सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगरसेवकांनी केली मागणी
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील पदपथांवर अतिक्रमण झालेले आहे. वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विषयावर स्थायी समिती सभेत चर्चा झाली. महापालिकेने या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी मध्यवर्ती कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील प्रत्येक प्रभागात पदपथांवर अतिक्रमण वाढत चालले आहे. पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणेसुद्धा कठीण झाले आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीदेखील होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आठ दिवसात सेल स्थापन करू
स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, पदपथांवर अतिक्रमणे झाल्याने नागरिकांना चालणेही मुश्किल झाले आहे. पदपथ पादचार्‍यांसाठी असतात. मात्र, फेरीवाले, हातगाडीधारकांनी त्यावर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी मध्यवर्ती कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. अतिक्रमणांवर कारवाईसाठी लागणारे सर्व साहित्य, मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल. आठ दिवसात सेलची स्थापना करण्याच्या सूचना केल्या आहेत. आठ दिवसातून एकदा तरी अतिक्रमणांवर कारवाई झालीच पाहिजे, असे सावळे यांनी सांगितले.

दसर्‍यानंतर कारवाईचा धडाका
अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे म्हणाले की, प्रत्येक प्रभागात अतिक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालणेदेखील कठीण झाले आहे. अतिक्रमणांबाबत नागरिकांच्यादेखील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कोणत्या भागात अतिक्रमण जास्त आहे, त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यावर सोपवली आहे. कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी येणार आहेत, याची खबर कोणाला कळून दिली जाणार नाही. ज्या परिसरात कारवाई करायाची आहे; त्या परिसरातील मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात येईल. दसर्‍यानंतर फेरीवाले, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे हांगे म्हणाले.