रस्ते विकासासाठी मनपास 75 लाखांचा निधी प्राप्त

0

जळगाव । शहरातील उपनगरातील अंतर्गत रस्त्यांची दुरूस्तीसाठी 75 लाखांचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. या अनुदानाचा धनादेश महापालिकेला जिल्हा प्रशासनातर्फे वितरीत करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य शासनाने रस्ता अनुदान मंजूर केले असून जळगाव शहरासाठी 75 लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

मनपा हद्दीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रस्ता बांधणी, डांबरीकरण, मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी, रस्ता, पूल रेल्वेपूल बांधणी, पदपथ बांधणी, भुयारी रस्ता आदी बाबींचा विकास करण्यासाठी सर्वसाधारण रस्ता अनुदान विशेष रस्ता अनुदान, अशा दोन प्रकारे रस्ता अनुदान देण्यात येते. मनपा वित्त आयोग मोटार वाहन कर आकारणी चौकशी समिती यांच्या शिफारशी विचारात घेऊन राज्यात दरवर्षी संकलित करण्यात येणार्‍या मोटार वाहन कराच्या 10 % रक्कम रस्ता अनुदान म्हणून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मंजूर करण्यात येते.