रस्ते व गटारांच्या कामांसाठी उपोषण

0

बारामती : बारामती नगरपरिषदेच्या वॉर्ड क्र.10मध्ये रस्त्यांची व गटारांची कामे या नागरिकांच्या सोयीसुविधांकडे नगरपालिका जाणूनबुजून लक्ष देत नाही. ही कामे व्हावीत या मागणीसाठी येथील नागरिकांनी बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषणास प्रारंभ केला आहे. ज्येष्ठ नेते नाना सातव, रासपचे किशोर मासाळ, विरोधी पक्ष नेते सुनील सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू आहे.

विशेष म्हणजे या उपोषणात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.  गेली तीन वर्षे नगरपालिकेस आम्ही सातत्याने आमच्या सुविधा मिळाव्यात यासाठी समक्ष भेटून निवेदनेही देण्यात आली. विशेषत: पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था भयावह असते. पायी चालने सुद्धा दुरापास्त असते. अंथरलेली खडी उद्ध्वस्त होऊन इतस्तहा पसरलेली आहे. याचा त्रास नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही चांगलाच जाणवतो. सातत्याने पाठपुरावा करून सुध्दा नगरपालिका प्रशासन कोणत्याही तर्‍हेचे दखल घेतली जात नाही. म्हणून आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय उरला नाही. असे अंदोलन कर्त्यानी यावेळी सांगितले.  नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी रस्ता मंजुर झाला आहे असे मोघम उत्तर गेली तीन वर्षे आम्ही ऐकतो आहोत मात्र नगरसेवकाच्या एका घरासाठी आडीच कि.मी. चा गुळगुळीत रस्ता होतो, घरे नसताना देखील विशिष्ट लोकांच्या जमीनीला भाव यावा म्हणूनही रस्ते केले जातात. ही संतापाची बाब आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन विशिष्ट लोकांसाठीच काम करते की काय? हा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही असेही या वेळी उपोषण कर्त्या महिलांनी सांगितले. या रस्त्याचे टेंडर निघालेले असून नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरीसाठी पाठविलेले आहे. याबाबतचा लवकरच निर्णय होईल. व येत्या दोन महिन्यात वॉर्ड क्र. 1मधील रस्त्यांची कामे होण्यास सुरुवात होईल यासाठी पदाधिकारी म्हणून आम्ही जबाबदारी स्वीकारीत आहोत, असे बारामती नगरपालिकेचे उपाध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.