भुसावळ। गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी तापी काठावर योग्य त्या उपाययोजनांसह रस्त्यांची डागडूजी तसेच पुरेशा पथदिव्यांची व्यवस्था करावी तसेच वाहनधारकांची गैरसोय टळण्यासाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करावी, अशी सूचनावजा तंबी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी विविध विभागातील अधिकार्यांच्या बैठकीत मंगळवारी दिली.
विसर्जनस्थळी हवी पुरेशी प्रकाश व्यवस्था
प्रांताधिकारी चिंचकर यांनी श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील बंदोबस्ताचा आढावा घेतानाच पालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या याबाबत माहिती जाणून घेतली. वाय पॉईंटपासून शहराकडे येणार्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने तातडीने सा.बां.विभागाने दखल घ्यावी, असे प्रांतांनी बजावले. तापी नदीकाठी हजारो भाविक श्री विसर्जनासाठी येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट उपलब्ध करावे तसेच पुरेशा प्रकाशासह जनरेटरची व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हाभरात स्वाईन फ्लू आजाराचा शिरकाव झाल्याने याबाबत काळजी घेण्यासंदर्भात जनजागृतीपर फलकही नदी काठावर तसेच जागो-जागी लावावेत, असेही चिंचकर यांनी सांगितले. शहरातील प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह नूतन तहसीलदार विशाल नाईकवडे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांच्यासह वीज वितरण कंपनी, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.