रस्त्यांच्या कामांवर बंदी घालण्याची मागणी

0

प्रस्ताव स्थायी समितीपुढे; आगामी बैठकीत होणार चर्चा

पुणे : दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील गल्लीबोळातील रस्त्यांच्या कामांवर बंदी घालण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली होती, परंतु आता नगरसेवकांकडूनही ती करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला असून, त्यावर आगामी बैठकीत चर्चा होऊन निर्णय होईल.

यंदा परतीचा पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीतही गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्यातही कपात करण्यात आली असून, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.

उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई

उन्हाळ्यात पाणी टंचाईची आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आताच पावले उचलून शहरातील गल्लीबोळातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे, तसेच ज्याला पाणी लागते, अशा कामांना बंदी घालावी, तसेच दुष्काळास सामोरे जाण्याची तयारी करावी, अशा मागणीचे पत्र नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी स्थायी समितीला दिले आहे.

प्रशासन कामांना स्थगिती देणार का?

काँक्रिटीकरणाची कामे थांबविण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांनीही महापालिका प्रशासनाकडे केली आहे. शहरात अपुरा पाणीपुरवठा होत असताना गल्लीबोळात काँक्रिटीकरणासाठी पाणी वापरणे हा अपव्यय आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाची कामे थांबवावीत, अशी त्यांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी पाणी कपातीच्या निर्णयानंतर झालेल्या मुख्यसभेतही महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांनी पाणी बचतीचे आवाहन करताना पाण्याचा सर्वाधिक वापर होणार्‍या कामांवर निर्बंध घालण्याविषयी आदेश देण्यात येतील, असे सांगितले होते. असे असताना दुसरीकडे रस्ते काँक्रिटीकरणाची अनेक कामे प्रस्तावित असून, काहींच्या निविदा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे पाणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन या कामांना स्थगिती देणार का? याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.