धुळे। शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून मनपा अधिकारी, पदाधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याने आज भाजपाने पेठ विभागातील खड्डे पुजन करून तीन दिवसात दुरुस्ती न झाल्यास मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पेठ विभागातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून अनेक लहान-मोठे अपघात याठिकाणी होत आहेत. मनपात तक्रार अर्ज देवूनही रस्ते दुरुस्ती होत नाही. सत्ताधारी आणि विरोधी केवळ ठेकेदारांची बिले काढण्यात मशगुल आहेत. तर नगरसेवक कामे करून घेण्यात अपयशी ठरत आहेत.
आंदोलनाचा निर्णय
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजपा पेठ विभागाने आंदोलनाचा निर्णय घेतला असून त्याचा श्रीगणेशा आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यांचे पुजन करून करण्यात आले. येत्या तीन दिवसात रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी दिला. या आंदोलनात भाजपा पेठ विभागाचे जितेंद्र धात्रक, शिरीष शर्मा, तुषार भागवत, सागर कोडगीर, किरण रनमळे, सचिन शेवतकर, संजय भारस्कर, अमोल भागवत, सचिन कायस्थ, स्वप्निल कुळकर्णी, भुषण सुर्यवंशी, विजय चौधरी, विनोद जगताप, अर्जुन ठोकाळ, रईस हिंदुस्थानी आदी सहभागी झाले होते.