रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालक संतप्त

0

कल्याण । रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे आता कल्याणकर नागरिकांसह रिक्षाचालक संतप्त झाले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात आले नाहीत, तर रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून रेल्वेला प्रचंड महसूल मिळतो, तरीदेखील येथील रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल रिक्षा चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी नाराजी व्यक्त करत रेल्वेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

तिन्ही रिक्षा स्टॅन्डमधील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय
कल्याण हे मध्य रेल्वेचे मोठे जंक्शन असल्याने येथे केवळ कल्याणच नव्हे, तर डोंबिववली, भिवंडी, उल्हासनगर, टिटवाळासारख्या दूर अंतरावरूनही रिक्षाने प्रवासी ये-जा करतात. सुमारे 10 हजार रिक्षा दिवसभरात या स्थानक परिसरात प्रवासी वाहतूक करतात, असा अंदाज आहे. या रिक्षांसाठी कल्याण स्थानक परिसरात पश्‍चिमेला नेहरू चौकासमोर, तिकीट घराबाहेर एसटी डेपोसमोर असे 3 रिक्षा स्टॅण्ड आहेत. या तिन्ही रिक्षा स्टॅण्डमधील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून खड्ड्यांमुळे रिक्षाचालकांना रिक्षा ढकलणेही सहज शक्य होत नाही, असे रिक्षा चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले. स्टॅण्डमधील रस्ते व्यवस्थित का ठेवले जात नाहीत, असा संतप्त सवाल परिसरातील रिक्षाचालकांनी केला आहे. वाईट रस्त्यांमुळे रिक्षाचालकांना रिक्षा स्टॅण्डवर उभी करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा रस्ता रेल्वेच्या हद्दीत असला तरी तेथील रस्त्याचे काम केडीएमसीकडून केले जात होते. परंतु सध्या केडीएमसीची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील रस्ते करण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे. रेल्वेला या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेकदा कळवल्यानंतरही प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षाचालक नाराज आहेत.