धुळे । शहराच्या विकासाआड, शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारे दुसर्या पक्षातील लोकांबरोबरच स्वपक्षातील नेतेदेखील असल्याचा गौप्यस्फोट शहराचे आ. अनिल गोटेंनी केला आहे. पांझरा चौपाटी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरेंनीच पाडली, असा खुल्लमखुल्ला आरोप आ.गोटेंनी केला. ‘तुम्ही पांझरा चौपाटी पाडा, नवीन चौपाटीला मी पैसे देतो’,असे डॉ.भामरेंनी सांगितले, त्याबाबतचा पुरावा माझ्याकडे आहे, असेही आ.गोटे म्हणाले.
झुलत्या पुलाचे काम सुरू होणार
सार्वजनिक जीवनात वावरतांना अनेक अडथळे मी पार केले आहेत. माझ्यात परिवर्तनाची आग आहे. ती तुमच्यातही पेटू द्या, साडेपाच कि. मी.लांबीचे रस्ते झाल्यानंतर 47 टक्के वाहतूक या रस्त्यांवरुन वळणार आहेत. त्याच बरोबर येत्या काही दिवसांत झुलत्या पुलाचे काम सुरु होणार आहे. 23 फूट उंचीची देशातील सर्वात मोठी भगवान शंकराची ब्रॉझ धातूपासून केली जाणार असून भगवान शंकराच्या जटेतून गंगा अवतरणार आहे. डॉ.पाथरीकर यांनी या पुलाचे डिझाईन करुन दिले आहे. साडेपाच कि. मी. लांबीचे रस्ते तयार होतानाच सहा चौपाट्या केल्या जातील.
‘माझ शहर बलतय‘ आंदोलन
महापालिकेत राक्षस बसविले गेल्याने शहर विद्रुप होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. महापालिका माझ्या ताब्यात आली तर पहिली दोन वर्षे दररोज सकाळ-संध्याकाळ एक तास पाणी धुळेकरांना मिळेल. आ.गोटे,तुम्ही महापालिका ताब्यात घ्या,मी शहराच्या विकासासाठी 500 कोटी देतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे आ.गोटे म्हणाले. ‘माझं शहर बदलतयं’ या अभिनव आंदोलनासाठी आ.गोटेंनी शिवतिर्थाजवळील कल्याण भवन येथे बैठकीसाठी जमा, अशी हाक धुळेकरांना दिली होती. या हाकेला आज धुळेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
लोकसंग्राम, भाजपा, विविध संघटना आणि आम धुळेकर नागरिकांनी या बैठकीत मते मांडली. आ.गोटे यांनी या बैठकीत शहर विकासाची संकल्पना आणि धुळेकरांनी त्यासाठी काय केले पाहिजे, याची रुपरेषा मांडली. आ.गोटे म्हणाले की, साडेपाच कि.मी. लांबीच्या रस्त्यांना विरोध होत आहे. या विरोधासाठी दिल्लीहून अर्थपुरवठा केला जात आहे. दिल्लीत कोण बसले आहे, हे वेगळे सांगायला नको, असे म्हणत नाव न घेता ना.डॉ.भामरेंवर त्यांनी टीका केली.
चौपटी डॉ. भामरेंनी पडलीचा आरोप
चौपाटीचे मारेकरी ना. डॉ. भामरेच असल्याचे आ. गोटेंनी जाहीरपणे सांगितले. ना. डॉ. भामरेंनीच चौपाटी पाडली, असेही ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे पारंपारिक राजकीय शत्रू राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरही टीका केली. पांझरा काठच्या रस्त्यांचे प्रकरण हरीत लवादाकडे गेले आहे. मात्र, मी हरीत लवादाकडे दादही मागणार नाही, वकिलही लावणार नाही, तसेच सुनावणीलाही हजर राहणार नाही, असे गोटेंनी सांगितले. आता धुळेकरांनीच ठरवावे, त्यांना काय हवे आहे? आता गप्प बसून चालणार नाही.तुम्ही आवाज उठविलाच पाहिजे असे आवाहन केले.
विकासात खोडा बनणार्यास बाहेर फेका
फॅशनस्ट्रीट, बाजार आणि इतर सुविधा पुरविल्या जातील. शहराच्या विकासाला खोडा घालणार्यांना बाहेर फेकायचे असेल तर महापालिकेत भाजपाला सत्ता द्या असेही आ.गोटे म्हणाले. यावेळी तेजस गोटे, भिमसिंग राजपूत, संदीप अग्रवाल, नगरसेवक दिनेश शार्दुल, बाळू शेंडगे, विजय जवराज, संजय बगदे, दिलीप साळुंखे, संजय बोरसे, राजेंद्र कोठावदे, दीपक जाधव, शिरीष शर्मा, योगेश मुकुंदे, अमित दुसाणे, प्रकाश महानोर, प्रशांत भदाणे, जितेंद्र धात्रक, मांगीलाल सरग, मनोज वाल्हे, डॉ. अनिल पाटील यांचसह धुळेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.