अलिबाग – अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची पुरेपूर वाताहात झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हाताबाहेर परीस्थिती गेलेली आहे. सर्वच प्रमुख रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले असून जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. अशात अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी जनतेलाच पुढाकार घेण्याचे आवाहन केले असून त्यांनी स्वतःच एका रस्त्याची डागडूजी केली आहे. अलिबाग बायपास ते डिकेटी हायस्कुल परीसरातील रस्त्याची डागडूजी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्वखर्चाने केली आहे.
रस्त्यांची डागडूजी करण्यास इच्छूक असलेल्यांनी संपर्क साधावा
अलिबाग परीसरातील खराब झालेल्या रस्त्यांची डागडूजी करण्यास इच्छूक असेल तर त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन नाईक यांनी केले आहे. रेवस, रेवदंडा, रामराज, वावे परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. आता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि लोकांनी पुढाकार घेतल्यास काहीसा दिलासा मिळणार आहे. अलिबाग शहरालगत असलेला बायपास रस्ता अलिबाग नगरपरिषद हद्दीत नसला तरी शहरालगत आहे. या रस्त्यालगत असलेल्या डीकेटी शाळेत शिकणारे हजारो विद्यार्थी व त्यांना शाळेत सोडायला येणार्यार पालक तसेच या रसत्याने प्रवास करणार्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. या रस्त्याची अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक व त्यांच्या सहकार्याचा मदतीने डागडूजी करून विद्यार्थी व नागरिकांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.
लोक प्रतिनिधींनी आपल्या गावालगतचा रस्ता सुधारावा
अलिबाग तालुक्यात अनेक उद्योगपती राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सरपंच आहेत जे अर्थिक दृष्ट्या सधन आहेत. अशा सर्वांनी आपल्या गावालगतचा रस्त्यावर पडलेले खड्डे पुढाकार घेऊन भरले पाहिजेत. प्रशासनाचा नावाने खडे फोडण्यापेक्षा स्वत: माणूसकीचा नात्याने हे काम हाती घेतले तर या खड्डेमय रसत्याने प्रवास करणार्या अनेक नागरिकांना आपण थोडासा दिलासा नक्की देऊ शकतो, असा विचार नाईक यांनी मांडला आहे.
उपक्रमात आपण सहभागी होऊन डागडूजी करण्यास तयार असेल तर त्यांनी मटेरील व लेबरची सोय करावी, त्याला लेवलींगसाठी लागणारा जेसीबी व रोलर माझ्या कडून मोफत उपलब्ध होईल. इच्छूकांनी 9370708100 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले आहे.