पाचोरा । दहिगाव सामनेर रस्त्याच्या दुरुस्तीचा दोन लाखाचा निधी परस्पर लांबवल्याची तक्रार अनिल पाटील या संबंधित शेतकर्याने दिली आहे. या अपहार झालेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी व पर्यायाने शासनाचा पैसा हडप करणार्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी होत आहे. ह्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणीही शेतकर्याने केली आहे. दहीगाव ता. पाचोरा येथून दहिगाव ते सामनेर व दहीगाव ते पाथरी असे दोन रस्ते जातात सामनेर रस्त्यावर सामनेर रेल्वे गेट बंद झाल्याने सामनेर जाण्यासाठी पाथरी गेटवरून सामनेर जाण्यासाठी रेल्वेने पर्यायी रस्ता बनवला आहे व तोच पुढे सामनेरला जातो.
सा.बां. व पं.स. माजी सभापती चौकशी होणार?
पाचोरा पंचायत समितीकडून वाढीव उपकर योजने अंतर्गत सामनेर ते दहीगाव रस्त्यांच्या कामासाठी 700 मीटरचे काम मंजूर झाले होते. तत्कालीन बांबरूड गणातील पं.स. सदस्य माजी पंचायत समिती सभापती यांनी पाचोर्याच्या मंजूर सोसायटीच्या नावाने हे काम घेतले होते. पाथरी खडीकरणारच्या रस्त्यावर केवळ 16 हजाराच्या मुरूम टाकून दोन लाख रुपयांच्या निधी हा शाखा अभियंत्याच्या संगनमताने परस्पर लांबवला व सामनेर रस्त्यावर कोणतेही काम केले नसल्याची तक्रार व सामनेर रस्ता दुरुस्तीला निधी मंजूर करून देण्याची मागणी दहिगाव संत येथील शेतकरी अनिल पाटील यांनी केली आहे.
गुणवत्ता नियंत्रण पथकाने केली पाहणी
सदरील काम दिलेल्या अहवालानुसार नसून गुणवत्ता नियंत्रण पथकाने कामाची पाहणी केली नाही. मुरूम दहिगाव संत येथून पाच कि.मी. अंतरावरून वाहतूक केली आहे. असे दाखवले. सामनेर रस्ता मंजूर असतांना पाथरी रस्त्यावर मुरूम टाकला आणि जो जुना रस्ता आहे. त्या रस्त्यावर मुरूम न टाकता परस्पर निधीचा अपहार केला. शासनाच्या व पर्यायाने जनतेच्या पैशांवर डल्ला मारणार्यांची कसून चौकशी व्हावी व लाटलेला, हडपलेला संपूर्ण पैसा वसूल व्हावा व फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, तसेच सार्वजनिक बांधकाम व पं.स. माजी सभापती यांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी संबंधित शेतकर्यांकडून होत आहे.