कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीमुळे शेकडो विद्यार्थ्यांवर अपघाताची टांगती तलवार कायम आहे. कल्याण पश्चिमेच्या भारताचार्य वैद्य चौकातील बालक मंदिर शाळेच्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून विद्यार्थ्यांचा मोठा अपघात झाल्यानंतर पालिका प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.
या शाळेमध्ये आजच्या घडीला सुमारे 700 च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यंदाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये याठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले. त्यासाठी शाळेकडे आणि आत सोसायटीकडे जाणारा पेव्हर ब्लॉकचा रस्ता खणण्यात आला. वास्तविकपणे काम पूर्ण झाल्यावर पेव्हर ब्लॉकचा रस्ता सुस्थितीत बनवणे गरजेचे होते. मात्र सुमारे 3 महिने उलटूनही हे काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे.
पत्रव्यवहार करुनही दुर्लक्ष
अर्धवट कामामुळे बर्याचवेळ शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक पडण्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती पालकांनी दिली. तर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता यासंदर्भात ’क’ प्रभाग कार्यालयाला पत्रेही देण्यात आले तरी परिस्थिती ’जैसे थे’ असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. त्यामुळे याठिकाणीदेखील एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अर्धवट कामासंदर्भात नगरसेवक अरुण गीध यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल. तसेच शाळेच्या विनंतीनंतरच ड्रेनेजचे हे काम करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
अशा प्रकारे अर्धवट काम करून ठेवणे चुकीचे आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेतली जाईल. तसेच संबंधित अधिकार्यांना तातडीने हे काम पूर्ण करण्याचे निर्देश देणार आहे.
– राजेंद्र देवळेकर,
महापौर, कल्याण-डोंबिवली महापालिका