। जळगाव प्रतिनिधी । Jalgaon Municipal Commissioner Satish Kulkarni । शहरातील शिवकॉलनी थांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गाला लागून प्रस्तावित रस्त्याच्या जागेत चक्क पेट्रोल पंपालाच महापालिकेने परवानगी दिल्याचा गंभीर आरोप होत असून, या प्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आयुक्तांविरोधात तक्रार केली जाणार आहे. शिवकॉलनीतील गट क्रमांक 52/2 मधील प्लॉट क्रमांक 22 मध्ये सध्या पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे. या कामासंदर्भात 3 जानेवारी 2022 रोजी, शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी महापालिकेत तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे, की प्लॉट नं 22 व प्लॉट नं 5 मधून डी पी रोड जात असल्याने प्लॉट नं 22/2 या जागेवर पेट्रोल पंपाची परवानगी मनपा नगररचना विभागारकडून देण्यात आली आहे. ही परवानगी कोणत्या नियमात दिली आहे. याची चौकशी मनपा आयुक्तांनी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, हा पेट्रोल रस्त्याच्या जागेत असल्यास आयुक्त सतीश कुलकर्णी हे गोत्यात येण्याची शक्यता आहे.
आयुक्त कार्यालयात माहिती कशी नाही ?
या संदर्भात मनपा आयुक्त कार्यालयाला काहीही माहिती नसल्याचे समजते. गंभीर तक्रार असलेल्या प्रकरणात प्रशासकीय प्रमुखाचे कार्यालयच अनभिज्ञ कसे, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. ज्या भागात पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे तेथील नगरसेवक नगरसेवक सचिन पाटील यांनीही आयुक्त कार्यालयाला चौकशीचे पत्र दिले आहे. ‘मी आयुक्तांकडे व नगररचना विभागाकडे तक्रार केली असून या प्रकरणी ते छाननी करतील, अशी अपेक्षा आहे’, अशी प्रतिक्रिया नगरसेवक सचिन पाटील यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केली.