बोर्ली । श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट येथून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे गेली 3 वर्षे हा रस्ता खड्डेमय झाला आहे. दिघी-वडवली फाटा-म्हसळा-माणगाव या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन करत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ श्रीवर्धन शिवसेना संघटनेच्या वतीने वेळास गावाजवळील शंकर मंदिराजवळ खड्डे खोदो आंदोलन करण्यात आले, तर येत्या आठ दिवसांत जर शासनाने व दिघी पोर्ट प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष दिले नाही, तर शिवसेना स्टाइलने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडून दिघी पोर्टमधून होणारी अवजड वाहतूक बंद पाडून दिघी पोर्टला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख रविभाऊ मुंढे यांनी दिला. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे दिघी-वडवली फाटा, मेंदडी-म्हसळा- साई-माणगाव या 57 किलोमीटर रस्त्याची गेली 3 वर्षे अतिषय दयनीय अवस्था झाली आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे, तर खड्ड्यांमुळे रस्त्यामध्येच बाळंतीण होण्याचा संतापजनक प्रकार घडून व विविध प्रकारे पाठपुरावा करूनही तसेच विविध उपोषण होऊनदेखील प्रशासनाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतेही सोयरसूतक नसल्याने अखेरीस श्रीवर्धन शिवसेना पक्षाच्या वतीने दिघी पोर्टपासून काही अंतरावर वेळास गावाजवळील शंकर मंदिराजवळ खड्डे खोदो आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिघी पोर्टच्या प्रशासनाविरोधात शिवसेना स्टाइलने घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनाबाबतचे निवेदन प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार निगुडकर यांनी तर दिघी पोर्टच्या वतीने तायडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी आपल्या मनोगतामध्ये जिल्हा प्रमुख रविभाऊ मुंडे यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, दिघी पोर्टचे मालक हे धोकेबाज आहेत जतनेच्या समस्येबाबत त्यांना कोणत्याही प्रकारे सोयरसूतक त्यांना नाही त्यांच्याकडे रस्त्यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केला पण दोन दिवसांत कामाला सुरूवात करतो असे आश्वासन दिघी पोर्टच्या मालकाने अनेकदा दिले. परंत,ु यांच्याकडून कोणत्याही प्रकारे रस्त्याच्या कामाची दुरुस्ती झाली नाही. उलट सर्वसामान्यांच्या त्रासात दिवसेंदिवस वाढ होत आहे, पण पावसाळा संपुन 2 महिने उलटले तरी दिघी ते माणगाव रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष नाही, म्हणून आज शिवसेना रस्त्यावर उतरली असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
येत्या 4 दिवसांत शासनाने दिघी पोर्टचे मालक कलंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावावा व रस्ते दुरुस्त करताना चांगल्या दर्जाचे काम करूनही घ्यावे असे आवाहन मुढे यांनी केले. या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे, सुजित तांदळेकर, प्रतोष कोलथरकर, नंदू शिर्के, अनिल नवगणे, सुकुमार तोंडलेकर, शाम भोकरे, जि. प. सदस्या सायली तोंडलेकर, श्रीवर्धन सभापती सुप्रिया गोवारी, उपसभापती बाबुराव चोरगे, पंचायत समिती सदस्या मीना गाणेकर, सरपंच गणेश पाटील, निवास गाणेकर, संदेश म्हसकर, कुणाल पेडणेकर, हेमलता रेळेकर, रवींद्र लाड, शरद खेडेकर, नंदु भाटकर, पिंट्या वेश्वीकर तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.