खिर्डी । रावेर तालुक्यातील धामोडी फाट्यावर शिंगाडी येथील गावकर्यांनी आपल्या विविध मांगण्यासाठी रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये शिंगाडी-धामोडी रस्ता, शिंगाडी-वाघाडी रस्ता, शिंगाडी-कोडदा रस्ता व भामलवाडी-शिंगाडी पुलावरील रहदारी बंद झाली होती. गावातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कष्टकरी ग्रामस्थांना बरेच वर्षापासून रस्त्यांच्या समस्यांचे समोर जावे लगत आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतीने रस्त्यांच्या संदर्भात ठराव देऊन पाठपुरावा केला परंतु प्रशासनाने कुठलेही दखल घेतलेली नाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झालेली आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना तसेच शेतकर्यांना ये- जा करताना अतिशय कसरत करावी लागत असते. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात देखील होत असतात. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करुन देखील कुठलाही पाठपुरावा होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला. या आंदोलनाला कुणाचेही नेतृत्व नसताना राष्ट्रवादी काँग्रेस, भारीप व भारत मुक्ति मोर्चा या पक्षांनी पाठिंबा दिला होता. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, मुकुंद सपकाळे, हबीब तडवी, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी, रघुनाथ चौधरी, भगवत सारठे, शैलेंद्र पाटील, नथ्थू पाटील, सोपान पाटील, काशिनाथ पाटील उपस्थित होते. तसेच आंदोलनास्थळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता के.व्ही. महाजन यांनी गावकर्यांचे प्रश्न सोडवू असे आश्वसन दिले. निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पाकळे, दहा कॉन्स्टेबल, दहा सीआरपी व दोन महिला कॉन्स्टेबल उपस्थित होते.