भुसावळ- रस्त्यातून उठा म्हटल्याने राग येवून चौघांनी दोघा भावांवर लाकडी दांडा तसेच दगडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना शहरातील मरीमाता मंदिराजवळ रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. दोघा जखमी भावांवर नगरपालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले. मरीमाता मंदिराजवळून रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास विक्की सोमनाथ चाले आणि दीपक सोमनाथ चाले हे दोन्ही भाऊ जात असताना रस्त्यावर चार अनोळखी तरुण बसले असताना त्यांना रस्त्यावरून उठा सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी लाकडी दांडा तसेच अनुकूचीदार दगडाने मारहाण करून जखमी केली तसेच हल्ल्यानंतर संशयीत पसार झाले. जखमी चाले भावंडांना तातडीने नगरसेवक मुकेश पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी पालिका दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी, संजय पाटील, इब्राहिम खाटीक व चंद्रशेखर गाडगीळ यांनी घटनास्थळी जाऊन तसेच पालिका दवाखान्यात जाऊन जखमींची चौकशी केली. या प्रकरणी विकी चाले यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार साहिल तडवी करीत असून पोलिसांकडून अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे.