शहादा । शहादा शहराच्या नागरीकांनी मोठ्या आशेने भाजपाला सत्ता दिली. परंतू सहा महिने उलटूनही शहादा शहराच्या काही समस्या माञ अजूनहि सुटत नसल्याचे चिञ आजही पहावयास मिळत आहे. शहादा शहराच्या अनेक समस्या आहेत. रस्ते, स्वच्छता, पाणी, अतिक्रमण, वाहतूकीची समस्या अश्या एक-अनेक समस्यांना शहादेकर सामोरे जात आहेत.शहराची मुख्य समस्या म्हणजे रस्ते-मागील नगर पालीकेच्या सत्ताधार्यांनी मोठा गवगवा करून अनेक कामांचे श्रेय तर घेतले मात्र त्यांनी केलेली कामे शहादेकर पहातच आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डोंगरगाव रोडवरील पटेल रेसिडेंसी ते स्वामी समर्थ केंद्रापर्यंतचा लाखो रूपये खर्च करून तयार केलेला कांक्रीटींग चा रस्ता अगदिच कुचकामी ठरत आहे.या रस्त्यावरील उखडलेल्या लोखंडी सळ्या वाहन धारकांना मोठा अडथळा ठरत आहे.
उखडलेल्या सळ्यांमुळे अनेकवेळा अपघात
या रस्त्यावरून नेहमी शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी रात्री अपरात्री ये-जा करीत असतात. या उखडलेल्या सळ्यांमुळे अनेक वेळा अपघात झालेला आहे. आणि भविष्यातही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहि. त्यामुळे सत्ताधार्यांनी ह्या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकीकडे सध्याचे नगराध्यक्ष स्वच्छ शहादा -सुंदर शहराचा नारा देत नाल्यांची व पाटचारीची साफसफाई करवून घेत आहे. शहादेकरांचा दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे की अनेक वर्षापासून कधीही साफ न करण्यात आलेल्या पाटचार्या मोतीलाल फकीरा पाटील नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्यावर तडफदारीने व कळकळीने स्वत:च्या निगराणी खाली स्वच्छ करून घेतांना दिसत आहेत. जेणे करून भविष्यात या पाटचार्या मधुन पाणी वाहतांना दिसेल. त्यामुळे शहरातील भूगर्भातील जी पाण्याची पातळी खालावलेली आहे तीला ह्या वाहत्या पाटचार्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. माञ जी मुख्य समस्या आहे त्या कडेही नगराध्यक्ष व त्यांच्या सोबतच्या पदाधिकार्यांनी लक्ष देणे क्रमप्राप्त झालेले आहे. लवकरात लवकर ह्या रस्त्याची समस्या मार्गी लावावी त्याच प्रमाणे ह्या रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करून परीसरातील नागरीकांना होणार्या त्रासातून मुक्त करावे हीच कळकळीची मागणी नागरीक करत आहेत.