शिक्रापूर । शिरुरमध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नसल्याचे वक्तव्य खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाच्याच खासदारांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
करडे येथील भैरवनाथ देवाच्या उत्सवाला शनिवारी (दि.4) खासदारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र जगदाळे (पाटील), उपसरपंच गणेश रोडे, माजी सरपंच पोपटराव लंघे, आप्पासो वाळके, केशव देशमुख, संजय जगदाळे, बबन वाळके, शिवसेनेचे शरद बांदल, सुधीर जगदाळे(पाटील), राजेंद्र गायकवाड, भाऊसाहेब पळसकर, संतोष घायतडक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करून केंद्रात व अनेक राज्यात मोदी सरकारने सत्ता मिळविली. परंतु सत्तेत आल्यावर मात्र सरकारने शेतकर्यांना व सर्वसामान्य लोकांना दिलेल्या आश्वासनांकडे पाठ फिरवली. त्यामुळेच आज सोशल मीडियातून सरकारवर मोठ्या प्रमाणावर टिका होत आहे. सध्या शिरुर तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असून रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे, असे आढळराव (पाटील) यांनी सांगितले.
आमदारांच्या कारभारावर टीका
शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर हे खासदार प्रथमच शिरुर तालुक्यातील पुर्व भागाच्या दौर्यावर आले होते. शिरुर लोकसभा मतदार संघाचेच खासदार असल्याने शिरुर तालुक्याची जबाबदारीही आढाळराव पाटील यांच्याकडेच आहे. खासदारांनी विद्यमान आमदारांच्या कारभारावर केलेली ही टीका असली तरी शिरुरच्याच खासदारांनी शिरुरमधल्या रस्त्यांबाबत व्यक्त केलेली नाराजी हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.