रस्त्याला अडसर ठरणारे मंदिर पाडले

0

धुळे । आज सकाळी सा.बां.विभागाचे अधिकारी आणि पोलिस कारवाईसाठी आले तेव्हा शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या आपण स्वतः आणि नागरिकांनी त्यांना कुठलीही नोटीस नसतांना कारवाई करता कशी? शासनाने कायदेशीररित्या दिलेली लिंगायत समाजासाठीची स्मशानभूमी आहे, त्यावर कारवाई कशी होईल? धार्मिक भावना दुखावू नका असे सांगत याबद्दल जाब विचारला तेव्हा मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे सांगत पोलिस बळाचा वापर करून लिंगायत समाजाच्या दफनभूमीलाही धक्का लावण्यात आला आहे. पोलिसांना मज्जाव केला म्हणून हिलाल माळी, शरद पाटील, नंदू फुलपगारे, मनोज जाधव, चुडामण मोरे यांना अटक केली आहे. याबाबत नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई
त्यावेळेच्या वादातून हिलाल माळींसह 100 हुन अधिक लोकांविरुध्द 307 चा गुन्हा दाखल झाला होता. दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचा दावा करत हा गुन्हा रद्द करावा यासाठी शिवसेनेने मोर्चाही काढला होता. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानकपणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक जुने धुळ्यातील महादेव मंदिराजवळ येवून धडकले. मंदिराचे पाडकाम होणार असल्याची खबर मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, प्रा.शरद पाटील सह 10 ते 15 जण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाडकामाला विरोध केला. त्यानंतर एसपींच्या आदेशान्वये त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानतंर पाडकामाला सुरूवात झाली. मंदिराचे पाडकाम करतांना मंदिर परिसरात तळघर सापडले.

10 ते 15 जणांना अटक
पांझरा नदी काठी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामात अडसर ठरणार्‍या महादेव मंदिराचे पाडकाम आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी मंदिरातील मुर्तींची विधीवत पुजा केली. मंदिराच्या पाडकामाला विरोध करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी,माजी आ.प्रा.शरद पाटील यांच्यासह 10 ते 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पांझरा नदीकाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी साडेपाच कि.मी. लांबीचे रस्ते तयार करण्याचे काम सुरु आहे. रस्त्यांच्या कामात जुने धुळ्यातील नदीकाठचे महादेव मंदिर आणि लिंगायत समाजाची स्मशानभुमी,त्याचबरोबर काही घरे अडसर ठरत होती. दि.30 मार्च रोजी रात्री मंदिर पाडले जात असल्याचा आरोप करत हिलाल माळी, जुने धुळ्यातील रहिवासी आ.गोटेंमध्ये सामना रंगला होता.

शिवसेनेतर्फे तीव्र निषेध
मंदीराच्या टवक्यालाही हात लावला असेल तर राजकारण सोडेल, राजीनामा देईन, असे म्हणणार्‍या आ.गोटे यांनी आज पोलिस बळाचा वापर करून नदीकिनारचे पुरातन महादेव मंदीरासह अनेक मंदीरे जमीनदोस्त केली आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमधील लबाडी यामुळे उघड झाली असून आ.गोटे हे लबाड राजकारणी आहेत. अशी खरमरीत टिका शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आ.गोटे यांच्यावर केली. आजच्या कारवाईचा तीव्र निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल. याची किंमत आ.गोटेंना चुकवावी लागेल असा इशारा दिले.

आ.गोटेंच्या कामांमुळे बददुवा लागेल
शहरात विकासकामांना प्रचंड वाव असतांना शहरात चोर्‍यामार्‍या होत असतांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न असतांना आ.गोटे केवळ लोकांना दिखावा करण्यासाठी एक-दोन विकासकामे करायची आणि या विकासाला शिवसेना विरोध करते असे चित्र निर्माण करण्याचे काम आ.गोटे करीत आहेत. आ.गोटे हे या शहरातील अत्यंत लबाड राजकारणी आहे, हे दिसून येते. आज गोटेंनी केलेल्या कामामुळे त्यांना मृतांची, मयत भक्तांची, देवाची-धर्माची बद्दुवा लागल्याशिवाय राहणार नाही.अशी संतप्त प्रतिक्रीया शिवसेनेच्या वतीने प्रा.शरद पाटील यांनी दिली.

विधीवत पुजा करून मुर्ती बाहेर
तळघरात वातानुकुलीत खोली होती. विधिवत पुजा करुन मंदिरातील मुर्ती बाहेर काढण्यात आल्या.त्यानंतर पाडकामाला सुरुवात झाली. रस्त्याच्या कामाला अडसर ठरणार्‍या काही झोपड्या लिंगायत समाजाची स्मशानभुमी यांचेही पाडकाम सुरु झाले. दुपारी उशिरापर्यंत पाडकाम सुरु होते. याकामावर बांधकाम विभागाचे मुख्यकार्यकारी अभियंता भदाणे, उपविभागीय अभियंता ए.बी.शहा, शाखा अभियंता झाल्टे,महसुल विभागाचे तहसिलदार अमोल मोरे, नायब तहसिलदार मिलिंद वाघ, मंडल अधिकारी सागर नेमाणे, मनपाचे नगररचनाकार पी.डी.चव्हाण, कमलेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, तसेच अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी सचिन हिरे, एलसीबीचे पीआय हेमंत पाटील,आझादनगरचे पीआय शिवाजी बुधवंत, देवपुर पीआय दत्तात्रय पवार, शहरचे पीआय दिलीप गांगुर्डे, एपीआय सपकाळ यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून होते.