जेजुरी । जेजुरी हे तिर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होत असते. ही अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेने अतिक्रमण विरोधी पथक तयार केले आहे. दररोज हे पथक आवश्यक त्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करणार असल्याची माहिती नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी दिली. जेजुरी पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वीणा सोनवणे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, मुख्याधिकारी संजय केदार व सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते. सभेनंतर नगराध्यक्षा सोनवणे यांनी पत्रकारांना माहिती दिली. भारत सरकारची योजना असलेल्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर बांधून देण्यात येणार आहेत. त्यासाठीचा ठराव घेण्यात आला. त्यासाठी लाभार्थींनी पालिकेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कडेपठारकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यात्रा अनुदाना अंतर्गतच्या निधीतून कडेपठारकडे जाणार्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.
मल्हार सागर धरणावरील पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दोन नवीन मोटारी खरेदी करण्यात येणार आहेत. चिंचेच्या बागेत स्नानगृह व स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. शहरातील महावितरणच्या विजेच्या खांबावरील तारांऐवजी आता भूमिगत वायरींग करणार आहे. त्यासाठी महावितरणला पालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, रस्ता खोदाईमुळे होणारे नुकसान महावितरणकडून घेतले जाणार आहे. अण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचा ठराव यावेळी घेण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.
पथकात 8 कर्मचार्यांचा समावेश
शहरातील वाहतुकीची समस्या व पोलिसांच्या सूचना लक्षात घेऊन पालिकेत अतिक्रमण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. एक अधिकारी व आठ कर्मचारी या पथकात काम करतील. गुरुवारी आठवडे बाजार, रविवारी व यात्रेच्या काळात व गर्दीच्या वेळी रस्त्यावर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी व वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी हे पथक कार्यरत असेल. पोलिसांची ही आवश्यक त्या ठिकाणी मदत घेतली जाणार आहे. जास्तीत जास्त रस्ते मोकळे ठेवण्याचा प्रयत्न या पथकाकडून होईल, असे सोनवणे यांनी बोलताना पुढे सांगितले.