रस्त्यावरील खड्डे बनले तलाव

0

होळनांथे। येथील मांजरोद रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खड्डे दिवसेंदिवस मोठे होत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यांना पावसाच्या पाण्याने तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. होळनांथे येथे मांजरोद रस्त्यांवर शिरपूर बाजार समितीच्या भुईकोट काट्याजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असते. होळनांथे-मांजरोद रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. तसेच या रस्त्यांलगतच शिरपूर मार्केट कमिटीच्या माध्यमातून भोईकोट काटा बसविण्यात आला असून येथे नेहमी अवजड वाहनांचा वापर होत असतो. अशा या वर्दळीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यातून वाहने काढतांना वाहनधारकांना अडचणी निर्माण होत असतात.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
येथील वर्दळीच्या रस्त्यावरील होळ ग्रामपंचायत शॉपींग गाळेसमोरील, शिरपूर मार्केट कमिटीच्या भुईकोट वजन काट्याशेजारीच व होळनांथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजुलाच असलेल्या सदर खड्डेयुक्त तलावाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष दिसून येत असून लोकप्रतिनिधींना याबाबत कोणतीही गरज नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत काही सत्ताधारी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते की, सदर रस्त्याच्या कामाबाबत शिरपूर तालुक्याचे आ.अमरिशभाई पटेल यांना सांगण्यात आले आहे. परंतु येथील खड्डेयुक्त तलाव बुजला जाईल का ? हा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांकडे उपस्थित होत आहे.

मांजरोद रस्त्यावरील खड्ड्यांची दुरूस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. परंतु, सार्वजनिक विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. खड्ड्यामय रस्त्यांवरून गाडी चालवत नेल्याने वाहनधारकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आल्याने नागरिकांच्या जीवताशी खेळले जात असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

रस्त्यांवर होते कोंडी
रस्त्यावरील खड्ड्यांना पावसाच्या पाण्याने तलावाचे स्वरूप आले असून छोटे वाहनधारक रस्ता ओलांडतांना खड्ड्याची चाचपणीकरत आपले वाहन खड्डेयुक्त तलावातून पुढे घेत असतात. या खड्यांमुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. नेहमीच वर्दळ असलेल्या होळनांथे-मांजरोद रस्त्यांची खड्यांनी दुदर्श केली आहे. पावसाला सुरूवात झाल्याने खड्ड्यांच्या त्रासात वाढ झाली आहे. या रस्त्याने अवजड वाहनांची नेहमी ये-जा सुरू असते. या अवजड वाहनधारकांमुळे रस्त्यांवर कोंडी होत असते. या खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग शोधणे अवघड बनले आहे.