रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये करणार वृक्षारोपण

0

बोदवड । जामनेर रस्त्यावरील राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जीव घेणे खड्डे तयार झाले आहेत. याठिकाणाहून वाहने ने-आण करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. याकडे मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास रविवार 6 रोजी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा संजय वराडे यांनी दिला आहे. यासंदर्भात वराडे यांनी बांधकाम विभागास निवेदन दिले आहे.

अपघात होण्याची शक्यता
सार्वजनिक बांधकाम उपविभाग बोदवडचे मालकीचे रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहे येथून ये- जा करताना खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरुन येणार्‍या वाहनांवरील लक्ष हटल्याने अपघात होत असतात. तसेच मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा तोलही जात असतो. त्यामुळे लहान मोठे अपघात वारंवार होत असून वाहनधारकांना इजाही होत असते. याबाबत वारंवार तक्रारी करुन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने पावसाच्या पाण्याने या खड्डयांमध्ये पाणी साचून परिसराला तलावाचे स्वरुप येत असते. त्यामुळे वाहनधारकांच्या अडचणीत अजूनच वाढ होत असते. या खड्ड्यांची अवस्था पाहता येत्या शनिवार 5 रोजी पर्यंत खड्डे खडी, डांबरने दुरुस्त करावे अन्यथा रविवार 6 रोजी सकाळी 11 वाजता खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार असा एका लेखी पत्राद्वारे 31 जुलै रोजी उपविभागीय अभियंता उपविभाग बोदवड यांना दिला आहे. निवेदनाच्या प्रती तहसिलदार, पोलीस निरीक्षक बोदवड यांना दिल्या आहे.