म्हसदी । साक्री तालुक्यातील काटवान भागातील रस्त्यांची पार दुर्दशा झाल्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांनी तीव्र संताप तीव्र संताप व्यक्त केला आहे. काटवान भागातील म्हसदी ते ककाणी, भडगावबारीपर्यंत,महसदी ते बेहेड, महसदी ते काळगाव, राहूडबारी पर्यत, महसदी ते चिंचखेडा व अक्कलपाडा, ककाणी ते राजबाई शेवाळी,व धमनार ते शेवाळी गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही उपयोग होत नसल्यामुळे वाहनधारकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या महिन्यात खड्डे बुजण्याची मोहीम राबवण्यात आली. पण ती नावा पुरतीच होती अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी काटेरी झाडे वाढली आहेत. अनेक ठिकाणी त्यामुळे समोरून येणारी वाहने वाहनचालकांना दिसत नसल्यामुळे अपघात ही वाढले आहेत. त्यामुळे तातडीने रस्ते दुरुस्त करण्यात यावेत अन्यथा संबंधित अधिकार्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व डी.डी.सी.बँकचे सेवा निवृत्त शाखाअधिकारी रमेश माधवराव देवरे,भाजपाचे कार्यकर्ते विजय शंकर देवरे, काळगांवचे राजधर देसले, चिंचखेडयाचे माजी सरपंच ओम प्रकाश बेडसे आदींनी केले आहे.