पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे
परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी घेतली महापौरांची भेट
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करणे, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस वाहने तातडीने हटविण्यात यावीत, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी ‘आरटीओ’च्या अधिकार्यांना केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी शहरातील वाहतुकीसंदर्भात महापौर जाधव यांची भेट घेतली. त्यावेळी शहरातील वाहतुक व्यवस्थेबाबत चर्चा झाली. रस्त्यावरील बेवारस वाहने तातडीने हटविण्यात यावीत, अशा सूचना कार्यालयात महापौर जाधव यांनी केल्या आहेत.
हे देखील वाचा
वाहनांमुळे कोंडीत भर
महापौर जाधव म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी बेवारस वाहने पडली आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडचण येत आहे. वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील बेवारस वाहने तातडीने हटविण्यात यावीत. शहरात रोजच वाहतूक कोंडी होत असते. वाहनांच्या चुकीच्या पद्धतीने वाहने चालविण्यामुळे तर नेहमीच कोंडी होते. तसेच अवैध वाहतूक करणारेही या वाहतूक कोंडीमध्ये भर घालत असतात. त्यामुळे ही बेवारस वाहने उचलल्यास वाहनांना पुढे जाण्यासाठी रिकामी जागा मिळेल.
नातेवाईकांसाठी विश्रांती कक्ष
महापौर जाधव यांनी चार दिवसांपुर्वी महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयास रात्री अडीचच्या सुमारास अचानक भेट दिली होती. त्यावेळी तेथील बरेच रुग्णांचे नातेवाईक उघड्यावर झोपल्याचे निदर्शनास आले. त्यांना थंडीच्या दिवसात अंगावर घेण्यासाठी अंथरुण नसल्याचे दिसून आले. वायसीएम रुग्णालयात येणारे रुग्ण हे सामान्य, गरीब कुटूंबातील असतात. त्यांना विश्रांतीसाठी स्वतंक्ष कक्ष असणे आवश्यक आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि.25) बैठकीचे आयोजन केले आहे. आयुक्तांसोबत चर्चा करुन रुग्णांच्या नातेवाईकांना विश्रांतीसाठी वायसीएमएचमध्येच व्यवस्था करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.