पुणे । शहरातील रस्त्यांवर रात्र काढणार्या तब्बल साडेदहा हजार मुलांच्या निवार्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेकडून हैद्राबाद येथील रेनबो संस्थेच्या माध्यमातून पालिकेच्या बंद असलेल्या शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास महिला आणि बालकल्याण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती समिती अध्यक्षा राणी भोसले यांनी दिली. महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि शिक्षण विभागाने या प्रकल्पांसाठीच्या जागा निश्चित केल्यानंतर या निवार्याबाबत समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली आहे.
5 वर्षासाठी 10 कोटींची गरज
महापालिकेने रस्ते, चौकांच्या परिसरात राहणार्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले होते. या मुलांसाठी सीएसआरअंतर्गत बजाज फिनसर्व कंपनीकडून खर्च केला जाणार आहे. मात्र, त्याची पुढील देखभाल महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी ही जबाबदारी हैद्राबाद येथील रेनबो संस्थेस देण्यात येणार असून त्यासाठी पुढील 5 वर्षासाठी 10 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.