रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांनो सावधान!

0

पुणे । रस्त्यावर कचरा टाकल्यास 5 हजार, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास किंवा अस्वच्छता केल्यास 2 ते 5 हजार, कचरा वर्गीकरण न केल्यास 3 ते 5 हजार असा दंड भविष्यात पुणेकरांना भरावा लागण्याची शक्यता आहे. शहरात दिवसेंदिवस गंभीर होत असलेली घनकचरा समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधी-2017 तयार केली आहे. ती मान्यतेसाठी विधी समितीसमोर ठेवली आहे.

शहरातील कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणेही अस्वच्छ करण्याची नागरिकांची आणि गावांची प्रवृत्ती दिसून येते. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महापालिकेने ही उपविधी तयार केली आहे.

राज्य शासन घेणार निर्णय
शहरात रस्त्यावर थुंकण्यापासून ते घनकचर्‍यामुळे अस्वच्छता, सांडपाणी रस्त्यावर सोडणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण न करणे अशा विविध कारवायांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रथम विधी समिती त्यानंतर स्थायी समितीकडे व शेवटी मुख्यसभेची मान्यता घेऊन ही उपविधी अंतिम मान्यतेसाठी राज्यशासनाकडे पाठविली जाणार आहे.

नागरिकांच्या सूचनांचा समावेश
तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याचा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी महापालिकेच्या कृती आराखड्यात या उपविधीला त्यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने ही उपविधी तयार केली असून, नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून त्यांचा समावेशही त्यात करण्यात आला आहे.

…तर 25 हजाराचा दंड
राज्य शासनाने या उपविधीला परवानगी दिली तर यातील तरतुदी अस्तित्वात येणार आहेत. इतकेच नव्हे तर नदीत राडारोडा टाकल्यास 25 हजार, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास 2 ते 5 हजार, ठेकेदारांकडून कचरा वाहतूक अयोग्य झाल्यास 5 हजार, कचरा प्रकल्प योग्यप्रकारे न चालल्यास प्रकल्प चालकासाठीही दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या उपविधीस महापालिकेच्या मुख्यसभेने 2013 मध्येच मान्यता दिली होती. मात्र, गेली चार वर्षे ती वेगवेगळ्या कारणास्तव मान्यता प्रक्रियेत अडकून पडली होती. यापूर्वी तयार केलेल्या उपविधीस मुख्यसभेची मान्यताही मिळाली नव्हती.