मुंबई । घाटकोपर पश्चिम शिवसेना शाखा क्रमांक 127 चे नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नगरसेवक निधीतून विभागात विकासाची कामे सुरू आहेत. गोळीबार रोड गणेश चौक येथे जुने पेव्हर ब्लॉक काढून नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून, याठिकाणी उखडून काढण्यात आलेले जुने पेव्हर ब्लॉक गोळीबार रस्त्याच्या बाजूला ढीग करून टाकण्यात आले आहेत. ज्या ठेकेदाराला येथील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम देण्यात आले आहे. त्याने रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक हटवण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
वाहतुकीला मोठा अडथळा
गणेश चौकातील काँक्रिटीकरणाचे काम दोन आठवडे होऊनही रस्त्यावर टाकण्यात आलेले पेव्हर ब्लॉकचे डेब्रिज न उचलल्याने दुर्दैवाने येथे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. गोळीबार रोडची रुंदी लहान असल्याने येथे दुतर्फा वाहतूक होत आहे. टाकलेल्या डेब्रिजमुळे हे पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या मध्ये येत असल्याने वाहतूकदरम्यान अपघात ओढवू शकतो. वाहतुकीत नागरिकांनाच रस्त्याच्या मधोमध पडणारे पेव्हर ब्लॉक उचलून बाजूला सारावे लागत आहे.