रस्त्यावर पार्किंग करणार्‍यांवर कर लादण्याचा प्रस्ताव

0

नवी मुंबई । नवी मुंबई – शहराच्या नियोजनात इमारतींना परवानगी देताना पार्किंगच्या व्यवस्थेची पडताळणी करणे ही मूलभूत गरज होती. मात्र, तसा विचार न करताच पार्किंग सुविधेशिवायच इमारती उभ्या राहिल्या. तसेच सार्वजनिक पार्किंगचीही पुरेशी व्यवस्था नाही. अशा परिस्थतीत रहिवासी रस्त्यावर गाड्यांचे रस्त्यावर पार्किंग करणार्‍या नागरिकांवर कर लादण्याचा प्रस्ताव नवी मुंबई प्रशासनाने आणला आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्याच्या बहाण्याने महिन्याकाठी चारचाकी गाड्यांसाठी साडेचार हजार रुपये, तर दुचाकींसाठी दीड हजार रुपये आकारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडला आहे. सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे नवी मुंबईतील रहिवाशांचे लक्ष आहे. ठाणे आणि पुणे शहरातही अशाच पद्धतीने शुल्क आकारणीचा झालेला प्रयत्न झाला असून त्याची अंमलबजावणी करता आलेली नाही. मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. 21 व्या शतकातील नियोजित शहर असे बिरूद मिरवले जाते. मात्र, असे असताना शहरात गाड्या, कारधारकांची संख्या वाढणार असल्याचे गृहित धरून मूळातच नियोजन केलेले नाही. असे असताना आता रस्त्यावर गाड्या उभारण्यांवर शुल्कभार टाकण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे.

आशिया खंडातील मोठी औद्योगिक वसाहत टीटीसी इंडस्ट्री, एपीएमसी मार्केट, विविध आस्थापना यामुळे नवी मुंबई शहरात येणार्‍या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रतिदिन सुमारे तीन लाख 50 हजार वाहने नवी मुंबई शहरातील रस्त्यांवरून जात असतात. तर काही वाहने सार्वजनिक सोसायट्या, मॉल, शॉपिंग सेंटर, हॉल, शाळा, कॉलेज, मैदाने, मार्केट विभाग, मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यावर बेकायदा दिवस-रात्र पार्किंग केली जातात. परिणामी वाहनचोरीच्या घटना घडत असतात.शहरातील सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तीने पार्किंग करणार्‍या वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज असल्याचे नमूद करत महापालिकेने सिडकोकडून मिळालेल्या भूखंडावर अद्ययावत तंत्रज्ञान वापरून वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेने निर्माण केलेल्या पार्किंगच्या जागेवर गाड्या उभ्या करण्यासाठी अल्प दर आहेत. तरीही वाहनधारक आपली वाहने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर पार्किंग करून निघून जातात. त्यामुळे अशा वाहनधारकांना शिस्त लावण्याची आवश्यकता असल्याचे म्हणत पार्किंग शुल्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रात्री 10 ते सकाळी आठ वाजेपर्यंत सार्वजनिक रस्त्यावर व पार्किंग क्षेत्रामध्ये आपली वाहने उभी करणार्‍या कारचालकांना चार हजार 500 रुपये तर दुचाकी वाहनासाठी प्रती एक हजार 500 रुपये दर प्रतिमहिना आकारण्यात येणार आहे. याशिवाय दिवसा चारचाकीला दोन तास पार्किंगसाठी 50 रुपये, दुचाकीला दोन तासांसाठी 20 रुपये आणि ट्रकला दोन तासासाठी 200 रुपये दर आकारण्यासंदर्भातील प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.