रस्त्यावर येणार्‍या जनावरांमुळे अपघातात वाढ

0
मालकांवर कारवाई करण्याची मागणी
वडगाव मावळ : पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे ते नायगाव दरम्यानच्या रस्त्याच्या दुभाजकांमध्ये आलेल्या जनावरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या जनावरांचे मालक चरण्यासाठी या दुभाजकांमध्ये सोडून देत आहेत. त्यामुळे महामार्गावर अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. दुभाजकामध्ये धोकादायक पद्धतीने चरायला सोडणार्‍या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर 24 तास औद्योगिक क्षेत्रातील अवजड वहानांची तसेच इतर वाहतूक सुरु असते. काही ठिकाणी महामार्गाच्या दुभाजकाची रुंदी जास्त आहे. त्यामध्ये चरण्यासाठी गवत असल्याने महामार्गालगतच्या शेतकर्‍यांची तसेच गोशाळेतील गाई, बैल, म्हैस तसेच वासरू अशी अनेक जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. ही जनावरे चरता चरता अचानक महामार्गावर येतात. वेगात असलेल्या दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनाचा ब्रेक न लागल्याने धडकून अपघात होतात. तसेच सीआरपीएफ दरम्यान काळा वळू दुभाजकामध्ये चरत असतो.
हॉटेलवाले टाकतात उरलेले अन्न
दिवसभर ही जनावरे या दुभाजकामध्ये चरत असतात. महामार्गावर सायंकाळी चरत चरत महामार्गावर आल्याने अनेकवेळा दुचाकीस्वार धडकून गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील काहींना जीव गमवावा लागला आहे. आयआरबी महामार्गावर टोल वसूल करते, पण महामार्गावरील प्रवास सुखाचा होण्यासाठी दुभाजकांमध्ये चारणार्‍या जनावरांवर कारवाई करत नाही. तसेच महामार्गाच्या बाजूलाच हॉटेलमधील उरलेले अन्न व कचरा टाकला जात असल्याने या जनावरांसह भटकी कुत्री, डुक्करे मुक्तपणे वावरत असतात. महामार्गावर चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांच्या मालकांवर तसेच महामार्गालगत हॉटेलमधील उरलेले अन्न व कचरा टाकणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रुपेश गराडे, अतुल वायकर, विशाल वहिले, अल्ताफ सय्यद, संतोष भिलारे, हरीष दानवे, शरद मोरे, प्रतिक पिंजण आदींनी केली आहे.