रहदारीमुक्त शहराचे अभियंत्यांसमोर आव्हान

0

पुणे । वाहनांची वाढती संख्या आणि शहरीकरण यामुळे आगामी काळात पुणे, मुंबईसारख्या शहरात रहदारीचा प्रश्‍न बिकट होणार आहे. विविध विभागात काम करणार्‍या अभियंत्यांसमोर या शहरांना रहदारीमुक्त करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यासाठी पालिकेतील 100 अभियंत्यांना रहदारीचे प्रशिक्षण घेण्यासाठी लवकरच सिंगापूरला पाठविले जाणार आहे, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

महापालिका अभियंता संघातर्फे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कुणाल कुमार बोलत होते. यावेळी संघाच्या कार्याध्यक्षपदी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी निवड करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त अभियंत्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानही कुणालकुमार आणि जेएनपीटीमधील ज्येष्ठ स्थापत्य अभियंता कमल लाला यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अभियंता राजेंद्र राऊत, केदार साठे, सुनील कदम, मुकुंद बर्वे, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलकांत वडेलकर, सन फाउंडेशनचे रवींद्र ढवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कुणाल कुमार म्हणाले, अभियंता दिनासारख्या उपक्रमामुळे एकमेकांच्यामध्ये संघभावना जोपासली जाते. आपण काम करीत असलेल्या खात्याचे किवा संस्थेचे उद्दिष्ट काय आहे, याची जाणीव प्रत्येक अभियंत्याला असायला हवी. आपल्या कामामुळे सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर कसे होईल, याचा विचार आपण केला पाहिजे. कमल लाला म्हणाले, अभियंता हा समाजाच्या विकासातील महत्त्वाचा घटक असतो. वेगवेगळ्या विभागात काम करताना अभियंत्यांनी आपली सर्वोच्च कामगिरी बजावली पाहिजे. आपल्या कल्पकतेतूनच नवनिर्मिती होत असल्याने आपण सातत्याने वेगळा विचार केला पाहिजे.

प्रशांत वाघमारे यांनी निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना भविष्यात संघासाठी आणि अभियंत्यांसाठी चांगले काम करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांच्या निवडीसाठी सुनील कदम यांनी सूचविले, तर मुकुंद बर्वे यांनी अनुमोदन दिले. सुनील कदम व कमलकांत वडेलकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय पोळ यांनी आभार मानले.