रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या बेशिस्त फळ विक्रेत्यांवर कारवाईचा दंडुका

0

भुसावळचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधालेंच्या कारवाईने खळबळ

भुसावळ- शहरातील पाणी गेट परीसरात रस्त्यावर बेशिस्तपणे लोटगाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या तब्बल 11 विक्रेत्यांवर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी सोमवारी कारवाई केल्याने खळबळ उडाली. हंबर्डीकर चौकात नेहमीच वाहतुकीची कोडी होते त्यातच रस्त्यावर बेशिस्तपणे वाहनधारक वाहने उभी करतात तसेच फळ विक्रेतेदेखील रस्त्यावरच लोटगाड्या लावत असताना येणार्‍या-जाणार्‍यांना मोठा मनस्ताप होत होता. सोमवारी शहर वाहतूक शाखेन केलेल्या कारवाईमुळे सुज्ञ शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

न्यायालयात होणार दंड
पाणी गेट परीसरात सहाय्यक फौजदार राजेश वणीकर, नाईक संदीप पालवे, कॉन्स्टेबल संदीप राजपूत, कॉन्स्टेबल विजया सपकाळे, अविनाश पाटील यांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या 11 फळ विक्रेत्यांवर मुंबई पोलीस अधिनियम 102/117 प्रमाणे कारवाई केली. संबंधिताना न्यायालयात हजर राहण्याचे कळवण्यात आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल, असे सहा.निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले.