नवी दिल्ली । भारतीय संघाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्याआधी खेळाडूंना कानमंत्र दिला आहे. रहाणेला विश्वास आहे की, कसोटी मालिकेत संघातील वरिष्ठ फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी जर त्यांच्या शैलीत खेळपट्टीनुसार खेळात बदल केला तर यश मिळेल.
रहाणे एका वृत्तावाहिनीसोबत बोलताना म्हणाला की, मला असे वाटते की, अश्विन आणि जडेजा दोघेही केवळ भारतातच नाहीतर परदेशातही चांगली कामगिरी करतात. भारतात एका खास अंदाजात गोलंदाजी करावी लागते. जर आपण मोईन अली, नाथन लिओन सारख्या फिरकी गोलंदाजांना पाहिले तर त्यांना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये वेगळ्या शैलीत गोलंदाजी करावी लागते. रवि शास्त्री आणि विराट कोहली यांचं कौतुक करताना तो म्हणाला की, संघामध्ये रवि भाई असल्याने आपण सकारात्मक विचार करतो. ते नेहमी स्वत:वर विश्वास ठेवण्यास आणि आपल्या खेळाची मजा घेण्यासाठी सांगतात. जो चांगलं प्रदर्शन करत नाहीत त्यालाही ते विश्वास देतात. विराटही प्रत्येकासोबत उभा असतो.