पुणे । मुंंबईकर अजिंक्य रहाणेच्या बॅटीतून सध्या धावांचा ओघ होत नाही आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पाच डावांमध्ये रहाणेला केवळ 17 धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे रहाणेच्या भारतीय संघातील स्थानाबद्दल ऊलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, अजिंक्य रहाणेच्या फॉर्मची चिंता करू नका असा सबुरीचा सल्ला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिला आहे. बंगाल आणि दिल्ली याच्यातील रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान गांगुलीने सांगितले की, रहाणे हा चांगला खेळाडू आहे. त्याचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय नाही. विराट कोहली, रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय याआधी दक्शिण आफ्रिकेत खेळलेले आहेत. आता हे सगळेजण सर्वोत्तम खेळाडू म्हणून आफ्रिकेत जाणार आहेत.
शिखर, मुरलीने सलामीला यावे
बंगाल क्रिकेट संघटनेचा प्रमुख असलेल्या सौरव गांगुलीने मुरली विजयचा सलामीचा साथीदार म्हणून शिखर धवनला पसंती दिली आहे. गांगुली म्हणाला की, शिखर धवन चांगल्या फॉर्मात आहे. मुरली विजयनेही श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाच्या आफ्रिकेतील कामगिरी संदर्भात गांगुलीने सांगितले की, संघ चांगला असला तरी हा दौरा तेवढा सोपा नाही आहे. फलंदाजांनी जर धावा केल्यावरच गोलंदाजांना विकेट्स मिळवता येतील.
हार्दिकला संधी मिळायला पाहिजे
केपटाऊनमध्ये 5 जानेवारीपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेत तिथल्या परिस्थितीनुसार अंतिम अकराजणांची निवड करण्यात येणार आहे. संघातील सहाव्या क्रमांकावर खेळण्याची हार्दिक संंधी देण्याबद्दल गांगुलीने सकारात्मक भूमिका घेतली. गोलंदाजीतील काही विश्लेषकांनी चेंडूला उसळी देणार्या खेळपट्टीवर हार्दिकच्या गोलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गांगुली म्हणाला की, हार्दिकला संधी दिली नाही, तर त्याच्या गोलंदाजीबद्दल कसं कळणार? त्यामुळे त्याच्याबाबतीत तुम्ही नेमका कसा विचार करताय ते महत्त्वाचे ठरणारे आहे. रोहित शर्माला दोन संधी मिळाल्या त्यात त्यांनी चांगली कामगिरी केली. पाटा खेळपट्टी असेल तर संघात जादा वेगवान गोलंदाज घ्यावा लागेल. पण खेळपट्टीवर गवत असेल, तर जादा फलंदाज संघात असायलाच पाहीजे. भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीमुळे गांगुली प्रभावित झाला आहे. गोलंदाजांनी परदेशातही त्याचे सातत्य राखायला पाहिजे. गांगुली म्हणाला की, सध्याची भारतीय गोलंदाजी आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ आहे की नाही हे समजेल. गोलंदाजांकडे वेग आहे यात शंका नाही. उमेश चांगली गोलंदाजी करतो. भुवनेश्वर कुमार फॉर्मात आहे. त्यामुळे काही वेळ थांबा.