चाळीसगाव – तालुक्यातील रहिपुरी येथील माजी सरपंचाने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवार दि.28 रोजी सकाळी उघडकीस आली. रहिपुरी येथील रहिवासी व माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य किरण नामदेव गुंजाळ (44) यांनी दि.28 रोजी पहाटे 4.30 वाजेपूर्वी आपल्या घरातील वरच्या मजल्यावर छताच्या लोखंडी कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मेहूणबारे पोलीसांना मिळालयानंतर पोलीसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण समजून आले नाही. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संजय नामदेव गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार मिलींद शिंदे करीत आहेत.