वरणगाव । दिपनगर येथुन आचेगाव फिडरसाठी 33 केव्ही वीज वाहिनी बदलविण्यात आली मात्र गेल्या अनेक दिवसापासून वीज वितरण कंपनी जुनी विजवाहीनी काढत नाही. या्मुळे रहिवास भागात नागरिकांना वरच्या घराचे काम करता येत नाही. यामुळे सदरची विज वाहिनी आठ दिवसात काढा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे गटनेते सुनिल काळे यांनी दिला आहे.
आचेगाव फिडरसाठी टाकण्यात आल्या होत्या तारा
अनेक वर्षांपुर्वी दिपनगर येथुन आचेगाव फिडरसाठी शेती शिवारातून उच्च दाब वाहिनी गेली आहे. कालांतराने ही शेती बिनशेती होवून सर्वत्र प्लॉट पडले. या ठिकाणी साईनगर, गणपती नगर, जगंदबानगर, विल्हाळे रोड, मकरंदनगर या भागात नविन प्लॉट पडून जवळपास 20 ते 25 वर्षांचा कालावधी लोटला गेला. या ठिकाणी अनेक ठिकाणी घरेदेखील बाधली गेली.
पावसाळ्यात रहिवाशांमध्ये असते भिती
काही घरे या विजवाहिनीच्या खाली बांधली. पावसाळ्यात या तारांमधून विजप्रवाह उतरणे, शॉक लागणे असे प्रकार घडत असल्याने सदरची विजवाहीनी त्वरीत काढण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली. तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार संजय सावकारे यांनी विशेष निधी मंजुर करून नागरीकाच्या घरावरील विजवाहीनी हटविण्यासाठी मंजुरी दिली. सदरचे काम संथ गतीने सुरू होते. तब्बल तीन ते चार वर्षांनी सदरचे काम पुर्णत्वास देखील आले. नविन विजवाहिनी मधुन विज प्रवाह देखील सुरू झाला आहे. यामुळे येथील रहिवाश्यांनी सुटकेचा श्वास देखील सोडला.
वितरण प्रशासनास दिले पत्र
मात्र जुनी विजवाहिनी काढली नसल्याने नागरीकांच्या घरांवरती अद्यापही सदरची विजवाहीनी आहे. यामुळे रहिवाशांना वरच्या मजल्याचे काम करता येत नाही. सदरच्या रहिवाश्यांनी पालीका गटनेते सुनिल काळे यांच्याकडे केली असुन सुनिल काळे यांनी उपकार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे. सदरची विज वाहिनी काढण्याचे काम आठ दिवसाच्या आत पर्ण करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजीमंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, मुक्ताईनगर कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्या आहेत