चाळीसगाव : तालुक्यातील रांजणगाव शिवारातील विहिरीच्या पाण्यात दोन चिमुकल्यांसह आईचा बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 29 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ईला मनोज पावरा (25) व रीतेश पावरा (5) व महेश पावरा (11 महिने) अशी मयतांची नावे आहेत. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, पाचोरा विभागाचे पोलिस उपअधीक्षक भरत काकडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
विहिरीत पडल्याने तिघांचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील मनोज पावरा हे कामानिमित्त रांजणगाव शिवारात गत महिन्यात आले होते. मयत ईला यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह असून ते दोन अपत्य व पत्नी तसेच तीन शालकांसोबत वास्तव्यास होते. घरात हालाखीची परीरस्थिती असल्याने पावरा दाम्पत्य ठिकठिकाणी कामे करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत होते. बुधवार, 29 रोजी रात्री 10.30 वाजेपूर्वी ईला पावरासह त्यांची मुले रीतेश पावरा, महेश पावरा यांचा मृतदेह रांजणगाव शिवारातील विहिरीत आढळला. विवाहितेने आत्महत्या केली की पाय घसरल्याने तिचा मृत्यू झाला याबाबत पोलिसांकडून माहिती काढण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पाचोरा विभागाचे पोलिस उपअधीक्षक विभागाचे पोलिस उपअधीक्षक भरत काकडे म्हणाले की, हा घातपात नसून प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचा प्रकार वाटतो मात्रतरीदेखील पोलिसांकडून या प्रकरणाची बारकाईने चौकशी सुरू आहे.