कोथरुड : जग वेगाने बदलत आहे. रोज काहीतरी नवे घडत आहे. ब्रेग्जिट, ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्ष होणे, असे बदल झाले. स्वप्नातही वाटत नव्हते, ते घडत आहे. त्या दृष्टीने आपणही आता ‘राइट टू एज्युकेशन’कडून ‘राइट एज्युकेशन’कडे जाणे आवश्यक आहे,” असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
भारत शिक्षण संस्थेतर्फे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. चित्रा नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘आपले भावी काळातील शिक्षण-बदलते निकष’ या विषयावर डॉ. माशेलकर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, शिक्षण विद्या अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. मजरबान जाल, संस्थेच्या अध्यक्षा अरुणा गिरी, उपाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले, “भविष्यातील बदल लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणाचा आताच विचार करावा. विविध क्षेत्रांत काम करण्यासाठी यंत्र मानवाचा उपयोग होत आहे. त्यामुळे नोकर्या जात आहेत. जुन्याच नोकर्यांचे प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत आहोत. त्यात बदल झाला पाहिजे.” करमळकर म्हणाले, विद्यापीठात नावीन्यपूर्ण गोष्टी आणण्यात येतात. मात्र, त्या स्वीकारण्याबाबत प्राध्यापकांत उदासीनता असते. सामाजिक विज्ञानाबाबत कॅम्पसमध्ये विदारक परिस्थिती आहे. प्राध्यापक वर्ग स्वत:त बदल घडवून आणत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थीं आणि समाजात बदल घडणार नाही.” डॉ. वृषाली देहाडराय यांनी सूत्रसंचालन केले. जाल यांनी आभार मानले.