मुंबई : राईट टू एज्युकेशन या योजनेतंर्गत बोगस कागदपत्रे सादर करुन काही मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणार्या आठजणांच्या एका टोळीला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमध्ये दोन एजंटसह सहा पालकांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कमरुथीन नेमुथीन शेख, युनूस इस्माईल बाजा, इम्रान इजाज सय्यद, फरजाना, मुमताज, शाहीन, जारेना, रुबीया अशी या आठजणांची नावे आहेत. सर्व मुलांना शिक्षण मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने राईट टू एज्युकेशन नावाची एक योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार ज्या पालकांची वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्या मुलांना पहिली ते आठवीपर्यंत फी माफ आहे. या मुलांना अॅण्टॉप हिल येथील सीबीएम शाळेत प्रवेश दिला जात होता. मात्र शाळेने केलेल्या पाहणीत काही पालकांनी बोगस कागदपत्रे तसेच प्रतिज्ञापत्र सादर करुन काही एजंटच्या माध्यातून मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर शाळेतील मुख्याधापक रिबेचा शिंदे यांनी अॅण्टॉप हिल पोलिसांत संबंधित एजंटसह पालकांविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर अॅण्टॉप हिल पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह इतर भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. हा गुन्हा दाखल होताच दोन एजंटसह सहा पालकांना पोलिसांनी अटक केली. सध्या ते सर्वजण पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. चौकशीत या पालकांना कमरुथीन शेख आणि युनूस बाजा यांनी शाळेत प्रवेश देण्यासाठी बोगस प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपये कमिशन घेतल्याचे उघडकीस आले आहे. पालकांनीही बोगस प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर त्यांनाही या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले आहे. या कारवाईने शाळेतील इतर पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.