नवी दिल्ली : लोकप्रतिनिधी जर चांगले काम करत नसेल तर त्याला निवडून दिलेल्या मतदारांना त्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार मिळायला हवा, असे मत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी व्यक्त केले आहे. बिगर राजकीय कुटुंबातील लोकांनी जाती-धर्म या मुद्द्यांचा आधार न घेता प्रतिभेच्या आधारे राजकारणात आले पाहिजे. निवडणूक जिंकणे कठीण नाही. राईट टू रिकॉलसाठी मी संसदेत खासगी विधेयक सादर करणार आहे. यामुळे हे निश्चित होईल की लोक आपल्या प्रतिनिधीच्या कामगिरीवर समाधानी नसतील तर अशावेळी त्याला हटवावेच लागेल, असे वरूण म्हणाले. यावेळी त्यांनी खासदारांच्या वेतनवाढीवरही नाराजी व्यक्त केली.
सातत्याने खासदारांची वेतनवाढ
घराणेशाहीवर बोलताना वरूण यांनी स्पष्ट मत मांडले की, मी गांधी नसतो तर कदाचित 29 व्या वर्षी मला लोकसभेचा खासदार बनण्याची संधीही मिळाली नसती. अशा प्रकारची संस्कृती उद्योग, क्रिकेट आणि चित्रपट क्षेत्रातही आहे, ती संपुष्टात आणली पाहिजे. भारतात सर्वांना योग्य आणि समानतेची संधी मिळाली पाहिजे. खासदारांच्या वेतनात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या आपण विरोधात आहोत. खासदारांनी स्वत:चे वेतन वाढवले नाही पाहिजे. खासदार म्हणून मी वेतन घेत नाही. हे पैसे एखाद्या बिगर सरकारी संघटना अथवा गरजूंना देण्यास मी लोकसभा अध्यक्षांना सांगितले आहे. वरूण गांधी हे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.