गुन्ह्यातील आरोपींची संख्या झाली आता 24 : गावात स्मशान शांतता
साक्री- तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळवण्याच्या संशयातून पाच जणांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली होती तर गुरुवारी महारू वनक्या पवार (22) या संशयीतास नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील चुलत मावशीच्या घरातून अटक करण्यात आली. दरम्यान, राईनपाडा गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून गावात शोधूनही पुरूष सापडत नसल्याची स्थिती आहे. पोलीस अटक करतील या भीतीने संपूर्ण गावातील पुरूषांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे.
संशयीतांना उद्या न्यायालयात हजर करणार
पाच भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत 24 आरोपींना अटक झाली असून त्यात महारू पवारसह 12 मुख्य आरोपींचा समावेश आहे तर यातील 23 आरोपींना पोलीस कोठडी संपल्याने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपास उपअधीक्षक श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.