मुंबईः शिवसेनेने भाजपसोबतची २५ वर्षापासून असलेली मैत्री तोडत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली, त्यानंतर शिवसेना आणि भाजपात कमालीची कटुता निर्माण झाली. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे पहिले जाते. युती तुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांनी एकमेकांवर जहरी टीका केली. मात्र काल शनिवारी संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येतील अशी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची तयारी सुरु झाल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या, मात्र यावर आज रविवारी २७ रोजी खुद्द फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा आमचा कोणताही विचार नाही, असे सांगत हे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही असे सांगितले. तसेच हे सरकार त्यांच्या अंतर्गत कुरघोडीमुळेच कोसळेल असेही त्यांनी सांगितले आहे. संजय राऊतांसोबत झालेली भेट ही सामन्याच्या मुलाखतीसंदर्भात होती असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुलाखतीत अटी
‘संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी मुलाखत घेणार असल्याचे सांगितले. त्यासंदर्भात त्यांचा मला फोन आला. पण या मुलाखतीबद्दल माझ्या काही अटी होत्या. मुलाखत अनकटच असेल आणि माझाही कॅमेरा तिथे असेल, असे मी त्यांना सांगितले. त्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो.
‘या बैठकीदरम्यान शिवसेनेसोबत सरकार स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. या सरकारबद्दल नागरिकांच्या मनात आक्रोश आहे आणि विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरणं आमचं काम आहे व ते सुरूच राहिलं. हे सरकार स्वतःच्या कृतीमुळं कोसळेल आम्ही ते पाडणार नाही. आम्हाला सत्ता-स्थापनेबद्दल घाई नाही,’ असेही यावेळी फडणवीस म्हणाले.