राखीव वनात गुरेचराई केल्यास कारवाईचा बडगा; उपोषणाची सांगता

0

रावेर। तालुक्यातील कुसुंबा परिसरात वनचराई करणार्‍या मेंढपाळ व्यक्तींवर कारवाई व्हावी म्हणून ग्रामस्थांनी पोलीस व वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासकीय कारवाईच्या आश्वासनानंतर सांगता करण्यात आली.

सातपुडा परिसरात मेंढ्या चराई होत असून जंगलाचा र्‍हास होत असल्याने कुसुंबा येथील नागरिकांनी त्यांना अटकाव केला होता तसेच वन विभागाने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना वन हद्दीतून बाहेर काढावे या मागणीसाठी रफिक तडवी, इतबार तडवी, गुलशेर तडवी, उघडू तडवी, अलाउद्दीन तडवी, जुम्मा तडवी, हबीब तडवी, रशीद तडवी, जाहीर तडवी आदींनी उपोषण छेडले होते. तहसीलदार विजय ढगे, वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सपकाळे यांनी उपोषणार्थींची चर्चा करून राखीव वनामध्ये केवळ स्थानिक ज्या गुरांची परवानगी असेल व ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच प्रवेश दिला जाईल, अनाधिकृत गुरे अथवा मेंढ्या आदी जनावरे आढळल्यास वन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. गुराख्यांनी आपली अधिकृत नोंदणी करवून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.