भुसावळ : औष्णिक विज निर्मिती केंद्रातून टाकाऊ स्वरुपात बाहेर निघणारी राख यामुळे परिसरात निर्माण होणारे प्रदुषण हि महावितरण प्रशासनाची डोकेदुखी ठरत असते. मात्र आता या राखेपासून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच राखेची उपयोगिता वाढविण्याकरिता आवश्यक ब्रँडिंग, प्रचार, प्रसार, करुन प्रोत्साहन दिले जाईल, यामुळे राखेपासून होणारे प्रदुषण तर कमी होईलच तसेच या वस्तूंच्या विक्रीपासून महानिर्मितीला आर्थिक फायदा देखील होणार आहे. यासंदर्भात महागॅम्सने कृती आराखडा मसुदा तयार केला असून त्यादिशेने वाटचाल सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या जानेवारी 2016 च्या अधिसूचनेतील सूचनेनुसार शंभर टक्के राखेचा वापर हा राखेपासून तयार होणार्या विविध उत्पादनांमध्ये 31 डिसेंबर 2017 पर्यंत करण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे राख वापर धोरणदेखील नुकतेच डिसेंबर 2016 मध्ये जाहिर झाले आहे. त्यामुळे राख उपयोगितेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
राखेचा उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन
राख उपयोगिता वाढविण्याकरिता पायाभूत सोयी सुविधा, उद्योजक, यंत्रसामग्री, औद्योगिक क्लस्टर, बाजारपेठ, प्रशिक्षण, प्रचार-प्रसार, राख वाहतूक इत्यादी बाबींवर महागॅम्सने कृती आराखडा मसुदा तयार केला आहे. महागॅम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने यांनी तांत्रिक सल्लागार समितीच्या द्वितीय बैठकीत प्रकाशगड येथे याबाबत माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष एस.एस. हुसेन होते. वीज केंद्रातील राखेच्या महत्तम उपयोगीतेकरिता महानिर्मिती राख व्यवस्थापन सेवा मर्यादित (महागॅम्स) हे एक विकासात्मक पाऊल असून यामाध्यमातून राखेचा उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन केले जात आहे.
तज्ञ व्यक्तिंची समिती
राख क्षेत्रासंबंधित तज्ञ व्यक्तींचा विशेषत्वाने तांत्रिक सल्लागार समितीमध्ये समावेश आहे. राज्याचे राख उपयोगिता धोरण तयार करताना मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण तज्ञ तथा महागॅम्सचे संचालक सुधीर पालीवाल यांनी यासंदर्भात अभ्यास करुन राख उपयोगिता धोरणाचा मसुदा तयार केल्याबद्दल, सदर बैठकीत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे विशेष आमंत्रित डॉ. स्वप्नील वंजारी यांनी राखेपासून वाळू निर्मिती करण्यासंबंधी केलेल्या प्रायोगिक प्रकल्पाबाबत माहिती दिली.
ब्रँडींगवर भर देणार
चंद्रेश परमार यांनी राखेपासून उत्पादने तयार करणार्या यंत्रसामग्रीबाबत नाविन्यपूर्ण माहिती दिली. डॉ. भद्रेश भट यांनी राखेपासून निर्मित विविध उपयोगी वस्तू दाखविल्या. राखेची उपयोगिता वाढविण्याकरिता आवश्यक ब्रँडिंग, प्रचार, प्रसार, प्रसिद्धी, विपणन याबाबत नागराज राव यांनी सांगितले. बी.एच. नारायणा यांनी राख आयात-निर्यात धोरण, सध्यस्थिती व नियोजन यावर विस्तृत विवेचन करुन औष्णिक वीज केंद्र परिसरात औद्योगिक क्लस्टर निर्माण करण्यासंदर्भात माहिती दिली.