राखेमुळे अपघाताला आमंत्रण

0

वरणगाव। येथील आशिया महामार्गावर फ्लाय अ‍ॅशची एका गाडीतून दुसर्‍या गाडीत भरण्याच्या कामामुळे महामार्गावरुन जाणार्‍या वानहधारकांचा जीव धोक्यात आला असून याकडे संबंधितत अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले आहे. दीपनगर औष्णिक केंद्रातील फ्लाय अ‍ॅश ठेकेदारामार्फत केंद्रातून बंदिस्त टँकरद्वारे बाहेर काढली जाते. ती राख सिमेंट बनविणार्‍या कंपनीला तसेच वीट बनविण्यासाठी वापरली जाते. औष्णिक विद्युत केंद्रातून अधिकृत ठेकेदाराकडून त्याने रजिस्टर केलेल्या टँकरमधूनच काढण्याची परवानगी असल्याने हा ठेकेदार आपल्या मालकीच्या टँकरमद्ये भरुन आणलेली फ्लाय अ‍ॅश दुसर्‍यांना विक्री करताना विद्युत केंद्राजवळील महामार्गावरील निर्मल ढाबा तसेच ढाब्याच्या समोरील जागेत एका टँकरमधील राख हवेच्या दाबाने दुसर्‍या टँकरमध्ये भरुन देतो. या प्रक्रियेदरम्यान हि राख संपुर्ण परिसरात हवेच्या दिशेने उडत असते. पर्यायाने वाहनधारकांच्या डोळ्यात अचानक हि राख उडल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटना देखील वारंवार घडत असतात. त्यामुळे महामार्गाजवळील राखेचे साठे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत.

वाहनांमध्ये भरतांना परिसरात फैलावता राखेचे लोट
दीपनगर औष्णिक विज केंद्रात मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडत असते. हि राख टँकरच्या माध्यमातून बाहेर पाठविली जात असते. मात्र विक्री करण्यासाठी महामार्गालगतच राखेचे ठिकठिकाणी साठे करण्यात आलेले आहेत. भुसावळहून वरणगावकडे जात असताना रस्त्याच्या दुर्तफा हे राखेचे साठे सर्वाच्याच दृष्टीस पडत असतात. ट्रॅक्टरमध्ये राख भरली जात असताना भयंकर प्रमाणात राख हवेत उडते तिचे प्रमाण अधिक असल्याने महामार्गावरुन जाणार्‍या वाहनधारकांना पुढील काहीच दिसेनासे होत असल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहे.

पिकांचे होतेय नुकसान
तसेच एकाच वेळी आठ ते दहा टँकरमध्ये फ्लाय अ‍ॅश भरण्याची ही अवैध प्रक्रिया सुरु राहत असल्याने महामार्गावर राखेचे ढीग निर्माण झाल्याची स्थिती निर्माण होत आहे. तसेच हि राख महामार्गासह शेती परिसरात मोठ्या प्रमाणात परसर असल्याने शेत पिकास नुकसानदायी ठरत आहे. याचा परिणाम शेतीवर होऊन जमीनीवर राखेचा थर साचत असल्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होऊन पिकांवर देखील याचा परिणाम होत असतो. यामुळे जमिनीत पाणी झिरपण्याची क्षमता घटून नापीकीचे प्रमाण वाढत आहे. पिकांवर देखील राख उडत असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव जाणवत असतो. पर्यायाने शेतकर्‍यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच महामार्गावर राख पसरत असल्याने अपेकांच्या दुचाकी घसरुन अपघात होत आहे.

अंकुश लावण्याची गरज
अवैधरित्या एका टँकरमधून दुसरर्‍या टँकरमध्ये राख भरण्यासाठी टँकरधारकांना संबंधित ढाब्यावाल्याकडून 50 रुपये भाडे आकारले जाते. परंतु या अवैधरित्या फ्लाय अ‍ॅश भरण्याच्या कामावर कोणताही अंकुश लागत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. महामार्गालगत परिसरात राखेचे ढिग ठिकठिकाणी टाकण्यात आल्याने ही राख हवेने उडून महामर्गावरुन जा- ये करणार्‍या वाहनधारकांना त्रायदायक ठरत असल्याने महामार्गालगत राखेचे ढीग त्वरीत हटविण्याची मागणी जोर धरु लागली आहे.