राख्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरु

0

जव्हार (संदीप साळवे) : भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी रक्षा बंधन सण साजरा केला जातो. श्रावणातल्या येत्या तिसर्‍या सोमवारी रक्षा बंधन असून या निमित्ताने जव्हारच्या बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या तसेच रंगांच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राख्या खरेदीसाठी महिला तसेच मुलींची दुकानात गर्दी दिसून येत आहे. बहीण भावाचे पवित्र नाते कायम रहावे तसेच कठीण प्रसंगात भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावास राखी बांधत असते, जर कुणाला सख्खा भाऊ नसेल तर मानलेल्या भावास राखी बांधली जाते. या दिवसाची सर्वत्र आतुरतेने वाट पाहिली जाते. घरापासून दूर असलेल्या भावाला आधीच पोस्ट तसेच कुरिअर ने राखी पाठविली जाते. 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत किमतीच्या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बहीण राखी बांधले म्हणून तिच्या आवडीच्या भेट वस्तूची आधीच तजवीज भावाकडून करून ठेवली जाते. श्रावणातील पहिला सण नागपंचमी पाठोपाठ रक्षाबंधन हा दुसरा सण असल्यामुळे रक्षा बंधन सणा निमित्त शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगली गर्दी होत असून राख्यांचा खप अधिक आहे.
– अमित मेतकर, दुकानदार

या वर्षी खूपच आकर्षक व विविध रंगांच्या तसेच कलाकुसरीच्या राख्या उपलब्ध असून किंमत देखील परवडणारी आहे.
– विशाखा अहिरे, ग्राहक