रागसंगीत व वाद्यवादनाच्या सुश्राव्य मिलाफाची अनुभूती

0

पुणे । अशी आमच्या पुण्याची पुंण्याई कोणी म्हणे स वा ई तर कोणी म्हणे ख वा ई। ‘सवाई’ गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा दुसरा दिवस रागसंगीत आणि वाद्यवादनाच्या सुश्राव्य मिलाफाने रंगला. महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफले भुवनेश कोमकली यांच्या गायनाने! मैफलीची रंगत उतोत्तर वाढत गेली. कला रामनाथ यांचे कसदार असे व्हायोलिन वादन, कौशिकी चक्रवर्ती यांचे बहादार गायन व ज्येष्ठ गायक पं. जसराज यांच्या गायनाने या दिवसाच्या परमोच्च रागमैफलीची सांगता झाली.

दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मुलतानीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. तसेच राग नंदकेदारमधील रचनाही सादर केल्या. भुवनेश कोमकली यांच्या अप्रतिम गायकीची सुरुवात राग मुलतानीने झाली.‘ रे हे बोल’ श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले. कोमकली यांच्या गायनाला हार्मोनियमची साथ करणारे सुयोग कुंडलकर, तबल्याची साथ करणारे प्रशांत पांडव, त्याचप्रमाणे विनय चित्राव आणि रामानुज विपट यांनी साथ केली. परंपरागत ख्याल रचनेसह त्यांनी सादर केलेल्या पं. कुमार गंधर्व रचित दृत लयीतील बंदिशीला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. मूळच्या माळवा प्रांतातील असलेल्या आणि पिता पं. मुकुल शिवपुत्र यांनी शोधलेल्या एका रचनेने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

…म्हणूनच कायम जमिनीवर
कलेला वय नसते हे माझ्या डोक्यात ठाम बसले आहे! लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि लहानांना साथसंगत करायलाही मी बसलो आहे. त्यांच्याकडूनही शिकायला मिळते. त्यामुळेच मी कायम जमिनीवर राहिलो. ‘हा काय गातो, तो काय वाजवतो’ असे म्हणत बसण्यापेक्षा स्वतःला शोधणे महत्त्वाचे असते, असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणार्‍या कलाकारांना दिला जाणारा ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ यावर्षी पं. नाना मुळे यांना जाहीर झाला आहे. या निमित्ताने ’आर्य संगीत प्रसारक मंडळा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात गुरुवारी श्रीनिवास जोशी यांनी पं. मुळे यांची मुलाखत घेतली.

व्हायोलिन वादनाने तल्लीन
दक्षिण आशियामधील विदुषी कला रामनाथ हे सर्वश्रेष्ठ व्हायोलिन वादकांमध्ये गणले जातात. ग्रॅ्रहमी पुरस्काराचे नामंकन प्राप्त रामनाथ यांच्या संगीत रचना ग्रॅहमी व ऑस्कर विजेत्या मुद्रिकांमध्ये सामाविष्ट झाल्या आहेत. कला रामनाथ हे प्रो. ई. एन. कृष्णन, डॉ. एम राजन व पं. जसराज यांचे शिष्य कला रामनाथ यांना सुरत्न 2017चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. प्रसिद्ध व्हायोलिन (हिंदुस्तानी) वादक कला रामनाथ यांचेही दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमात व्हायोलिन वादनाचे सादरीकरण झाले. त्यांनी राग शामकल्याणने सादरीकरणास सुरुवात केली. पं.योगेश शमसी (तबला), वैशाली कुबेर व वैष्णवी अवधानी (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली.

पं. मुळे यांनी अनेक वर्षे स्व. पं. भीमसेन जोशी यांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना तबल्याची साथसंगत केली आहे. लहान वयात तबलावादन सुरू केल्यापासून मोठमोठ्या गुरूंकडून तबला शिकण्याची मिळालेली संधी, प्रत्येक गुरूकडे मागितलेला तबला वादनाच्या ज्ञानाचा प्रसाद, संगीत नाटकांसाठी गाणी बसवताना आणि प्रत्यक्ष रंगमंचावर ती गाणी सादर करताना गायक आणि तबलावादक यांच्यात होणार्‍या गमतीजमती, अशा विविध गोष्टींविषयी पं. मुळे भरभरून बोलले. त्याबरोबरच त्यांच्या अद्वितीय तबला वादनाची झलकही प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाली. तबल्यावर कंठसंगीत वाजवणे सर्वांत कठीण असते. गाण्याची लय, बंदिश आणि अर्थ समजून वाजवावे लागते, तसेच रागाच्या स्वभावानुसार ठेका बदलत न्यावा लागतो. तबलावादकाने कुणाचेही गाणे पाडायचे नसते. एखादा गायक तालाला कमजोर असेल तरी त्याला सांभाळून घेत उत्तम साथ करणे ही तबलावादकाची सत्त्वपरीक्षा असते, असे ते म्हणाले.

‘कट्यार’ आणि ‘मत्स्यगंधा’ही…
‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या 400 प्रयोगांसाठी, तर ‘मत्स्यगंधा’ नाटकाच्या 350 प्रयोगांसाठी आपण तबलावादन केल्याचे पं. मुळे यांनी सांगितले. ‘कट्यार’ पाहण्यासाठी मदन मोहन, आर. डी. बर्मन असे मोठमोठे संगीतकार येत आणि तबल्यासाठी विशेष दादही देत. मला चित्रपटांमध्ये वाजवण्यासाठी अनेकदा विचारणा झाली. परंतु मैफलींमध्ये वाजवणे हीच माझी आवड असल्यामुळे मी तिकडे गेलो नाही, असेही पं. मुळे यांनी सांगितले. त्यानंतर ‘षड्ज’ या कार्यक्रमात प्रजना परिमिता पराशेर दिग्दर्शित पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील माहितीपट दाखवण्यात आला.