राजकारणाचा काय भरवसा, बंडखोर कशावरून ‘आपले’च होणार नाहीत?

0

अमित महाबळ, जळगाव: जळगावच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांकडे लक्ष न देता अधिकृत उमेदवारांना कौल देण्याचे आवाहन जनतेला जरी केले असले, तरी सध्याची राजकीय गुंतागुंत आणि भाजपाची स्वबळावर सरकार स्थापनेची महत्त्वाकांक्षा पाहता भविष्यात हेच बंडखोर कशावरून भाजपाचे सहयोगी होणार नाहीत? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. हा प्रश्न सहजच उपस्थित झालेला नाही, तर त्यामागची पार्श्वभूमीही नाट्यमय घडामोडींनी भरलेली आहे. राजकारण हे सरळ कधीच नसते तर कायम वळणावळणाने घडत असते.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या झालेल्या जागावाटपातील नाराजीवरून राज्यभरात बंडखोरांचे पेव फुटले आहे. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील नाराज रिंगणात आहेत आणि आता त्यांची धास्ती महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, चोपडा तसेच जळगाव ग्रामीण या मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे. आ. एकनाथराव खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील बंडखोर ठरले आहेत. भाजपाला सभागृहात आ. एकनाथराव खडसे नकोत म्हणून पक्षाने छुपा पाठिंबा देऊन पाटील यांना उभे केले गेले असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. चंद्रकांत पाटील हे विजयी झाले तर दुसर्‍या बाजूने खडसे पराभूत झालेले असतील. म्हणजेच भाजपाची कथित इच्छा पूर्ण झालेली असेल.

जळगाव ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला मिळाला आहे. शिवसेेनेचे उमेदवार म्हणून गुलाबराव पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे रिंगणात आहेत. त्यांना अपक्ष उमेदवार लकी टेलर यांनी पाठिंबा दिला आहे. एकाच म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. हेच तत्त्व या रणनीतीमागे असल्याचे म्हटले जात आहे. गुलाबराव पाटील पडले तर अत्तरदे मोठे होतील. त्याचा आनंद भाजपाला आणि त्यांच्या नेत्यांना होणार नाही का?

जळगाव ग्रामीणची रणनीती पाचोर्‍यात अवलंबिली जात असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे किशोर पाटील यांच्या विरूद्ध अमोल पंडितराव शिंदे हे प्रबळ दावेदार रिंगणात आहेत. त्यांचेही भाजपा कनेक्शन आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते पक्षात सक्रीय होते. शिंदे हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
एरंडोल-पारोळ्याची जागा शिवसेनेला मिळाली आहे. शिवसेनेकडून चिमणराव पाटील हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात माजी तालुकाप्रमुख दशरथ महाजन यांच्या पाठिंब्यावर गोविंद शिरोळे हे रिंगणात आहे. शिवसेनेतील दुहीचा फायदा उद्या भाजपाला होऊ शकतो. चोपड्यात शिवसेनेकडून लताबाई सोनवणे रिंगणात असूनही त्यांच्या विरोधात भाजपाचे जिल्हा परिषदेतील सभापती प्रभाकर सोनवणे रिंगणात आहेत. तेही तोडीस तोड उमेदवार मानले जात आहेत.

हिंदू हृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेना आणि भाजपाचे संबंध मधुर राहिलेले नाहीत. भाजपा कायमच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहू इच्छितो. त्यामुळेच गेल्यावेळी युती फिस्कटली होती आणि यंदाही याच मुद्यावरून (कोणाला किती व कोणत्या जागा) युतीच्या घोषणेला विलंब झाला होता. त्यामुळे गुलाबराव पाटील बंडखोर उमेदवारांच्या विरोधात कितीही बोंबाबोंब करत असले तरी राजकारणाचा काय भरवसा द्यावा, उद्या सत्तास्थापनेसाठी हेच बंडखोर भाजपात दाखल होऊ शकतील किंवा सहयोगी म्हणून भूमिका बजावतील. मावळत्या टर्मला अमळनेरचे शिरीष चौधरी हे भाजपाचे सहयोगी आहेत. मुख्यमंत्री आजच्या घडीला एवढेच म्हणाले आहेत की, बंडखोरांकडे लक्ष देऊ नका. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना कौल द्या पण उद्या अधिकृत उमेदवार (नको असलेले) जर पराभूत झाले तर बंडखोरांना आम्ही जवळ करणार नाही, असे काही एक आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाही. राजकारणात काहीही घडते. आ. एकनाथराव खडसेंना अशा तर्‍हेने बाजूला केले जाईल, असे त्यांच्या निष्ठावंतांनाही वाटले नसेल. राजकारणात निष्ठा आणि विचार बदलत जातात. राष्ट्रवादी व काँग्रेसवाले ‘आपले’ होऊ शकतात तर बंडखोर का होणार नाहीत?