राज्यातील 25 जिल्हा परिषदा अध्यक्षपदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत अभ्रद युतीचीच चर्चा रंगली गेली. 25 पैकी 10 जिल्हा परिषदांवर भाजपने वर्चस्व मिळवलं आहे. यापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपच कमळं फुललं. त्यामुळे इतर राज्याच्या विधानसभा निवडणुका असो वा महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या पदरात यश पडलं आहे. त्यामुळे भाजपला मिळालेला जनाधार आपण नाकारू शकत नाही. भाजपला ग्रामीण सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली. जिल्हा परिषदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या होमपीचवर शिवसेनेने विजय मिळवून भाजपला धक्का दिला आहे. शिवेसेनेकडून भाजपच्या प्रदेश अध्यक्षाला दिलेला धक्का हा निश्चितच भाजपच्या जिव्हारी लागला असेल. दुसरीकडे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते छगन भुजबळांच्या नाशिकमध्ये सेनेची सरशी झाली आहे. सध्या छगन भुजबळ हे तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद खिळखिळी झाली असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे नाशिकमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी चक्क शिवसेना-काँग्रेस आणि माकप अशी आघाडी बघायला मिळाली.
नाशिक महापालिकेत मनसेची एकहाती सत्ता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावण्यात यश मिळवलं असल, तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनेे झेंडा फडकावला आहे. जळगावमध्येही भाजप-काँग्रेस आणि शिवसेना-राष्ट्रवादी अशी युती-आघाडी पाहायला मिळाली. जळगावमध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्ता मिळवणे हेच ध्येय असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे कोकणात वर्चस्व आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात काँग्रेसने, रत्नागिरीत शिवसेनेने तर रायगडमध्ये राष्ट्रवादीने यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रे्रसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे रा. जि. प.च्या अध्यक्ष झाल्या. हे सगळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडलं असलं, तरी पंचायत समितीच्या निवडणुकीत यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. याठिकाणीही शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून सत्ता काबीज केली.
जुन्नर, जालना खेड या पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना – काँग्रेसने हातमिळवणी केली. पलूस चांदवड या पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादीची आघाडी झालीय, तर चिपळूण पंचायत समितीतही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आली आहे, पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातील परळी आणि आंबेजोगाई या दोन्ही पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवले. तो पराभव त्यांनी जिल्हा परिषदे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भरून काढला. राष्ट्रवादीच्या एका गटाने समर्थन मिळवल्याने मुंबईसह दहा महापालिकेच्या निवडणूक पार पडल्या त्यात भाजपला चांगलं यश संपादन केलं. उत्तर प्रदेश निवडणुकीतही भाजपला निर्विवाद यश मिळालं आहे. केंद्रात व राज्यात शिवसेना भाजप बरोबर सत्तेत आहे. मात्र, दोघांमधील संघर्ष नेहमीच चव्हाट्यावर आला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील दरी वाढत गेली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ती आणखीनच वाढली आहे. हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही स्पष्ट होतंय. राज्याच्या सत्तेत असतानाही शिवसेना भाजपला नेहमीच कोंडीत पकडण्याचा डाव शिवसेनेकडून खेळीत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांबरोबर सहभागी होण्याची भूमिका शिवसेनेने घेतली. त्यामुळे भाजपही अस्वस्थ आहे. शिवसेना भाजपमधील अंतर्गत वाद इतका वाढलाय की मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेंनाही आता वेग आला आहे. भाजपकडून तशी चाचपणी सुरू आहे. या सगळ्या गोष्टी असल्या, तरी भविष्यात राजकारणाची दिशा बदलणार असल्याचेच हे संकेत आहेत.
– संतोष गायकवाड
9821671737