सदाभाऊ खोतांबद्दलची कालची बातमी राजकारणातल्या बदलांच्या उमेदीने काम करणार्या कार्यकर्त्यांना पुन्हा विचारात टाकणारी ठरली आहे. हे कार्यकर्ते आता रामदास आठवले व सदाभाऊ यांचा स्वतंत्रपणे विचार करुनही राजकारणात जो धूर्त लोकांचा संधीसाधूपणा वरचढ ठरतो त्याचा मुकाबला कसा करायचा, या विचारांनी अस्वस्थ आहेत. या दोघांचीही पार्श्वभूमी तशी पूर्णपणे वेगळी आहे. ध्येयही वेगळे म्हणता येईल. ध्येयपूर्तीसाठी राजकीय सत्ता आपल्या हातात असावी या उद्दीष्टपूर्तीपर्यंत पोहचण्याची संधी नियतीने या दोघांना दिली हाच तो फक्त समान धागा आहे. मात्र, कधीच सोप्या नसलेल्या या वाटचालीत ज्याच्या-त्याच्या स्वाभाविक धारणांसह तात्विक भूमिकेला आव्हान दिले जात असल्यानंतरची वाट्याला येत असलेली जीवघेणी अस्वस्थता खोतांच्या रुपाने हे कार्यकर्ते सध्या अनुभवत असावेत.
या सगळ्या घटनाक्रमात खोत व आठवले यांची कोणत्याच मुद्यावर तुलना करता येणार नाही. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या प्रतिमा भिन्न आहेतच. त्याचप्रमाणे एकप्रकारे सुरक्षित डावपेच खेळण्याची संधी जशी नियतीने आठवलेंना दिली तशी खोतांना मिळालेली नाही. पुढच्या काळातही खोत त्याबाबतीत त्यांच्या वकुबाप्रमाणे राजकारणावर तात्काळ प्रभाव टाकणारे राजकीय उपद्व्याप करु शकतील की नाही, हे कुणीच नेमके सांगू शकणार नाही. तसा खोतांचा पिंड आठवलेंपेक्षा पूर्ण वेगळा असल्याचेही सगळ्यांना माहिती आहे. सत्ताधार्यानां दबावात ठेवणार्या खेळ्या खेळण्यात माहीर नसलेले खोत म्हणूनच उपद्रवी ठरत नाहीत. राजकीय सत्तेवर दबाव कायम ठेवण्याची क्षमता असूनही आपण वापरलेच जातो, हे लक्षात आल्यावर आठवलेंनी उगवत्या सूर्याला नमस्कार घालणे मान्य केले. सुदैवाने त्यांचा तो नमस्कार सत्तेच्या सारीपाटावर यशस्वीही ठरला. राजकीय अहंभावाच्या या संघर्षात सत्तेपेक्षा कामाला महत्व देणारे खोतांसारख्या कित्येक कार्यकर्त्यांना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही या न्यायाने अनेक सत्तास्थानांवरुन माघारी फिरावे लागलेले अनुभव राजकारणातल्या बदलांच्या उमेदीने काम करणार्या कार्यकर्त्यांना याआधीही आलेले आहेत. प्रतिमासाधनेच्या चाणाक्ष राजकारणात टिकून राहणे ज्यांना जमले ते शहाणे ठरतात, त्या टिकण्याला ते महत्व देतात म्हणून पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा; या धोरणाला महत्व येते, या सुत्रात बसणारे खोत नाहीत, हीच खदखद या कार्यकर्त्यांना पुन्हा सतावते आहे.
ज्या स्वाभिमानी पक्षाच्या पुढाकाराने सदाभाऊ विधानपरिषदेचे आमदार बनले त्या पक्षाचे नेते राजु शेट्टी यांच्याशी झालेले मनभेद हे या बेबनावाचे खरे कारण आहेत. या दोघांचीही ध्येयसिध्दी एकच असताना त्यांना विभक्त करणारांचे डाव यशस्वी होऊ पाहात आहेत. भाजपकडून सदाभाऊंचा वापर केला जातो आहे, या विचारांनी स्वाभिमानी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. या घडामोडींचे तात्कालिक परिणाम काहीही होऊ शकतात. सदाभाऊंचे मंत्रीपद जाणे , ही त्यातील सर्वात मोठी व महत्वाची घटना ठरु शकते. स्वाभिमानी पक्षाचा सदाभाऊंनी लागलीच त्याग केला तरी नंतर लगेच भाजपकडून त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी हालचाली केल्या जातील का?, त्या कशा असतील?, स्वाभिमानी पक्ष सत्ताधारी महायुतीतून बाहेर पडणार का?, असे झाले तर शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी महायुतीचे नेतृत्व करणार्या भाजपशी संघर्षाची भूमिका घेणार्या शिवसेनेकडे सदाभाऊ जातील का?, असे कित्येक पदर या चर्चेला आहेत.
शेट्टी व खोत यांच्यात फूट पाडून आज हातात असलेल्या सत्तेचे बूड मजबूत करणे , एवढेच भाजपचे लक्ष्य असेल तर पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव असलेल्या स्वाभीमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संताप भाजपला महागात पडू शकतो, हा आशावाद भाबडा ठरला तर तो पुन्हा संधीसाधू राजकारणाचाच विजय ठरेल, ही सुधारणावादी कार्यकर्त्यांची मनोभूमिका पुढच्या काळात बाजारलक्ष्यी अर्थसत्तेच्या सध्याच्या वातावरणात चुुरगाळून टाकल्यासारखी स्तब्ध झालेली दिसते आहे. अर्थसत्ता व राजसत्तेच्या दोषांशी मुकाबला करताना त्यांना प्रकाश आंबेडकर, सदाभाऊ खोत, राजु शेट्टी, महादेव जानकर, बच्चु कडू, रघुनाथदादा पाटील, मेधा पाटकर, अण्णा हजारे, एच. एम. देसरडा, पोपटराव पवार, यांच्यासह अर्थक्रांती , नाम फाऊंडेशन यांच्या रुपातील विखुरलेली शक्ती एकत्र आलेली हवी आहे.
राजसत्तेच्या धोरणाला वळण देत दबाव कायम ठेवणारे हे लोक एकत्र आले तर पुढच्या काळात बाजारलक्ष्यी अर्थसत्तेने दुर्बल ठरवलेल्या शेतकरी व कामगारांच्या संघर्षाला पुन्हा उभारी देता येईल. राज्यकर्त्यांना उदारीकरणाच्या वातावरणात भांडवलदारांकडे वाहवत जाण्यापासून रोखता येईल, हा त्यांचा आशावाद त्यांना व्यवस्थेच्या सगळ्या दुखण्यांवरचा रामबाण इलाज वाटतो आहे. राजकीय सत्तेचे अनभिषिक्त सर्वोच्च स्थान या आशेनेच झुकवण्याचा या कार्यकर्त्यांचा पिंड असतो मात्र, या मार्गातील खोत व आठवलेंच्या रुपातील धोके त्यांची उमेद बर्याचदा घालवतात. सच्चे कार्यकर्ते या मंडळींकडेच मोठ्या आशेने आजही पाहाताहेत. सत्तेच्या खेळात नामोहरम झालेला सदाभाऊ, हे त्यांचे उद्दीष्ट कधीच नव्हते. नैसर्गिक न्यायाच्या तत्वांनी मजबूत झालेली चळवळ त्यांना राज्यकर्त्यांच्या उरावर बसवून पुढे न्यायची आहे. आठवले व खोतांचे राजकारणात वापरले जाणे ही त्यांची खरी सल आहे. यावर सध्या तरी कोणताही उपाय दिसून येत नाहीय.